जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात हरकती, सूचना आणि आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. एकूण 771 ग्रामपंचायतींसाठी जाहीर करण्यात आलेल्या या आराखड्यावर तब्बल 516 हरकती दाखल झाल्या असून, त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पाच तालुक्यांतील हरकतींबाबतची माहिती बुधवारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली नव्हती.
महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. नागरिकांना आपले मत मांडण्यासाठी 13 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयांमध्ये ही रचना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती, तसेच तहसीलदारांकडे हरकती दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, हरकती दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नव्हता. मात्र, त्यानंतरच्या दिवसांमध्ये नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला 516 हरकती दाखल झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
यामध्ये आठ तालुक्यातील हरकतींचा समावेश आहे. कोपरगाव, राहाता, नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील हरकतींबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर यामध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. या हरकतींचा मुख्य सूर प्रभाग रचनेतील बदलांवर आधारित आहे. अनेक नागरिकांनी आपल्या कुटुंबांचा समावेश दुसर्या प्रभागात करण्यात यावा, अशा प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. काही ठिकाणी प्रभागांची भौगोलिक रचना, लोकसंख्या आणि सोयी-सुविधांच्या आधारे फेरबदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, 2024 पासून विविध निवडणुकांमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. लोकसभा, विधानसभा व विधान परिषद निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम ठरविण्यात येत असल्याने, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये विलंब झाला आहे. जिल्ह्यात एकूण 866 ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित असून, त्यातील 771 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. तालुकानिहाय पाहता श्रीगोंदा (258) तालुका हरकतींमध्ये आघाडीवर असून, त्याखालोखाल नगर (67), जामखेड (55), कर्जत (41), श्रीरामपूर (33), पारनेर (26), संगमनेर (25), राहुरी (8) आणि अकोले (3) तालुक्यांचा समावेश आहे.


