अहिल्यानगर -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, नगर परिषदा यासह महानगर पालिका व मुंबई पालिकाच्या एका मतदान केंद्रात किती मतदार असावेत, याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.या सुचनानूसार आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत झेडपी पंचायत समितीसाठी एकत्र असणाऱ्या मतदान केंद्रात ८०० ते ९०० तर स्वतंत्र निडणूका होणाऱ्या झेडपी – पंचायत समितीच्या मतदान केंद्रात ९०० ते १ हजार मतदार राहणार आहेत. हे प्रमाण एकत्रित व स्वतंत्रपणे होणाऱ्या नगर पालिका नगर परिषदांसाठी ७०० ते १ हजार असे राहणार आहे.
या अनुषंगाने मतदान केंद्रांचे नियोजन करून मतदान केंद्राची संख्या निश्चित करावी, तसेच तेथे मतदारांसाठी विविध सुविधा पुरवाव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणूका होणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिका यांच्यासह महानगर पालिकांच्या निवडणूकांचा बिगूल वाजवणार आहे.
यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच पालिकांमध्ये आणि महानगर पालिकांमध्ये प्रभागरचनेचा कार्यक्रम राबविला जात आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत प्रभागरचना अंतिम केल्या जातील. एकीकडे ही प्रक्रिया सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांची संख्या निश्चित करावी, असे आदेश यंत्रणांना दिले आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रात जास्तीजास्त आणि कमीत कमी किती मतदार असावेत, याबाबत सुचना काढल्या आहेत.
यासह मतदान केंद्र तयार करताना मतदारांना प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. साधारणतः मतदाराला त्याच्या घरापासून दोन किलोमीटरच्या आत मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावे. ग्रामीणमध्ये वाड्या-वस्त्या, दुर्गम भाग, विरळ लोकसंख्येचा विचार करून मतदान केंद्राची निर्मिती करावी. मतदारांना रांगेत उभे राहावे लागू शकते. त्यामुळे मतदान केंद्रांमध्ये मंडप, पिण्याच्या पाण्याची व बसण्यासाठी सुविधा, मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ईव्हीएम ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
महापालिका एक सदस्य १ हजार ते १ हजार २००. द्विसदस्य ९०० ते १ हजार. त्रिसदस्य ८०० ते ९००. चार सदस्य ७०० ते ९००. पाच सदस्य ६०० ते ७००.
नगर परिषद एक सदस्य-१ हजार १ हजार २००. एक सदस्य (थेट अध्यक्षांसह) ९०० ते १ हजार. द्विसदस्य ९०० ते १ हजार. त्रिसदस्य ७०० ते ८००. त्रिसदस्य ६०० ते ७००
नगर पंचायत एक सदस्य १ हजार ते १ हजार २००. एक सदस्य (थेट अध्यक्षांसह) ९०० ते १ हजार.
जिल्हा परिषद पंचायत समिती एकत्र निवडणूक ८०० ते ९०० आणि स्वतंत्र निवडणूक ९०० ते १ हजार,
ग्रामपंचायत बहुसदस्यी ८०० ते ९०० आणि बहुसदस्य (थेट सरपंचासह) ७०० ते ८०० असे मतदार राहणार आहेत.


