Wednesday, November 12, 2025

माझे सगळे सहकारी गेले तरी मी साहेबांसोबत एकनिष्ठ राहीलो ७ वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही; शरद पवारांसमोर जयंत पाटील भावूक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली. तत्पूर्वी, जयंत पाटील यांनी त्यांच्या 7 वर्षातील कार्यकाळावर प्रकाश टाकला. गेल्या 7 वर्षात त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेल्या पक्षातील घडामोडी आणि घटनांची माहिती दिली. मी 2633 दिवस पक्षाचा अध्यक्ष आहे. 7 वर्षे एकही सुट्टी न घेता आपण पक्षासाठी काम केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. तसेच, बायकोलाही मी हे सांगितलं, असं म्हणताना जयंत पाटील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

जयंत पाटलांनी भाषणाची सुरुवात करतानाच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज यादीत घालण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच, साताऱ्यातील पुसेसावळी येथे धर्मावरून दंगल घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्यावर आता कुठेतरी उत्तरेतील प्रभाव दिसू लागला आहे. उत्तरेतील काही राज्यातील लोकांना खुश करण्यासाठी हिंदी सक्तीचे प्रयत्न झाले. मुंबई महापालिका निवडणुकात एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला, असे म्हणत जयंत पाटलांनी सरकावर हल्लाबोल केला. शेतकरी रोज विविध संकटाना तोंड देत आहे, शेतकऱ्याने बैल नाही म्हणून नांगरला जुंपून शेती करत असल्याचं चित्र महाराष्ट्राने पहिल, असं कधी आधी झालं नव्हतं. सातबारा कोरा करू, अशी आश्वासने महाराष्ट्रातील जनतेने ऐकली आहेत. विधानसभेला आपण खूप ताकद लावली परंतु यश मिळाल नाही. आता बिहारमध्ये सगळी मतदारयादी नव्याने करत आहेत. 35 लाख मतदार यांनी बाद केले, असं प्रत्येक राज्यात केल जाईल. आता हे विविध राज्यात होईल, असा संभाव्य धोकाही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आपल्या पक्षाची दुसऱ्या पक्षासारखी परिस्थिती नव्हती, तरीदेखील दोन अमोल माझ्यासोबत होते. एक अमोल कोल्हे आणि एक अमोल मिटकरी, सध्या मिटकरी तिकडे गेले. त्यावेळी आपण 54 जागा जिंकल्या, 17 टक्के मतदान आपल्याला मिळालं. त्यावेळी सत्ता आली आणि कोव्हिड आला. राजेश टोपे यांचं काम कुणीही विसरणार नाही. पण, मतदारसंघांतील लोक कसे विसरले माहिती नाही, असे म्हणत टोपे यांच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त केला. सामान्य माणसाचा थेट संपर्क शरद पवारांसोबत झाला. त्यावेळी परिवार संवाद यात्रा काढण्यात अली होती. 7 हजार 600 किमी आम्ही प्रवास त्यावेळी आम्ही केला होता. जिथ आम्ही निवडणुका लढत नव्हतो, तिथ देखील आम्ही पोहोचलो. शरद पवार यांच नाव घेतलं की महाराष्ट्रात कोणत्याही गावात 50 कार्यकर्ते सहज मिळतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

माझे सगळे सहकारी गेले तरी मी साहेबांसोबत एकनिष्ठ रहाण्याचा निर्णय घेतला, 7 वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही ते सांगितलं, असे म्हणताना जयंत पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, दोन खासदार असलेला भाजप मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर, शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles