लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेतून आता २८ लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत. आणखी अटी लावून ५० ते ६० लाख महिलांची नावे योजनेतून कमी करणार असल्याचा आरोप त्यांना केला आहे. रोहित पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ‘मतदान मिळवण्यासाठी महायुती सरकारने या योजना आणल्या होत्या. लाडकी बहीण योजनेमध्ये २८ लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहे. यामध्ये धार्मिक पर्यटन अशी एक योजनाही बंद करण्यात आली. शिक्षणासाठी काही योजना आणल्या होत्या, त्यादेखील बंद करण्यात आल्या. आनंदाचा शिधाही बंद करण्यात आला लोकांचा वापर करुन आता त्यांना हे विसरले आहेत. निवडणूका संपल्या विषय संपला’, असे रोहित पवार म्हणाले.
‘लाडकी बहीण योजना जेव्हा आणण्यात आली तेव्हा आम्ही बोललो होतो की, २४ ते २५ लाख महिलांची नावे योजनेतून काढतील अशी भीती आहे. त्याला उत्तर देताना मंत्र्यांनी आम्ही कुठेही कोणाचे नाव कमी करणार नाही, असे सांगितले होते. आता योजनेतून तब्बल २८ लाख महिलांची नावे कमी केली आङेत. आणखी अटी लावून ५० ते ६० लाख महिलांची नावे कमी करु शकतील’, असे वक्तव्य रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केले.
रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आगामी निवडणुकीचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ते थांबलेले आहेत. स्वत: योजना बंद करतील नाहीतर कोणालातरी कोर्टात पाठवतील आणि कोर्टाच्या माध्यमातून या योजना बंद करायला लावतील. कॉन्ट्रॅक्टरची हेयर रक्कम देण्यासाठी मोठे मोठे कर्ज काढली जातात. शक्ती महामार्गात सरकारमध्ये असलेल्या नेत्यांनी २५ ते ३० हजार कोटींचा मलिदा मिळणार आहे. ते देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा आहे. पण लोकांना मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही.’


