भिंगार कॅम्प हद्दीत बनावट विदेशी दारू साठ्यावर एलसीबीचा छापा; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भिंगार कॅम्प हद्दीत कारवाई करत बनावट विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.
दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पथक भिंगार कॅम्प हद्दीत माहिती घेत असताना, विजय कौशिक रा. भिंगार याने आलिशा मंझील, महेशनगर, बाराबाभळी येथील पहिल्या मजल्यावरील भाड्याच्या खोलीत बनावट लेबल लावलेली दारू ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पथकाने पंचासमक्ष छापा टाकला असता, विजय बलेश्वरसिंह कौशिक (वय ४६, रा. प्लॉट नं. ५, विजयनगर, भिंगार) हा मिळून आला. घरझडतीत LIGHTHOUSE Extra Smooth WHISKY कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. बाटल्यांवरील लेबलवर किंमत, बॅच नंबर व उत्पादन तारीख नसल्याने बनावट लेबल असल्याची खात्री पटली.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १,७५,००० रुपये किमतीच्या ७५० मिलीच्या १७५ बाटल्या आणि २०,००० रुपयांचा एक मोबाईल असा एकूण १,८५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चौकशीत हा मुद्देमाल साथीदार संदीप सानप रा. मेहकरी, ता. अहिल्यानगर (फरार) याच्याकडून घेतल्याचे आरोपीने सांगितले.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२), ३४१(२), ३(५) सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(ब)(ई)(फ), ६६, ८०, ८१, ८३, ९०, १०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष मुटकुळे, सपोनि भोये, पो.अं. संदीप पवार, संतोष खैरे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर व सुनिता पवार यांच्या पथकाने केली.


