विधानपरिषद निवडणुक‌ राष्ट्रवादीचा दावा कायम …..सचिन जगताप आणि चंद्रशेखर घुलेंच्या नावावर चर्चा

अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. काल शिष्टमंडळाने पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. तसेच समन्वय समितीचे सदस्य हसन मुश्रिफ यांचीही भेट घेऊन ‌‘नगरची जागा आपलीच आहे, ती आपल्यालाच हवी‌’ अशी भूमिका मांडली. यावेळी पक्षश्रेष्ठींनी ‌‘याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला जाईल,‌’ अशी ग्वाही दिल्याचे समजले.अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा तीन पंचवार्षिकपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. स्व. अजित पवार यांच्या नेतृत्वात गतवेळीही राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप विजयी झाले होते. त्यामुळे यावेळीही पहिला दावा हा विद्यमान आमदार असलेल्या आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा असल्याची भूमिका कार्यकर्त्यांची आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना भेटले. त्यांना महायुती म्हणून ही जागा आपल्याकडे राहावी, असा आग्रह धरला. त्यांनीही यावर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली जाईल, असे सांगितले. तसेच मुश्रीफ यांचेही कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. त्यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले गेले.

अहिल्यानगरमध्ये 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी भाजपाकडे चार आमदार असले तरी राष्ट्रवादीकडेही संग्राम जगताप, आशुतोष काळे, किरण लहामटे आणि काशीनाथ दाते हे चार आमदार असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे भलेही पक्ष म्हणून आपल्याकडे मतदारसंख्या कमी असेल; मात्र महायुती म्हणून भाजपाने मोठे मन करून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, अशीही अपेक्षा त्यांनी श्रेष्ठींकडे व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचा आढावा घेतला. त्याचबरोबर नगरमधून इच्छुकांचीही शिष्टमंडळाकडून माहिती घेतली. यावेळी स्व. अरुणकाका जगताप यांचे सुपुत्र सचिन जगताप, तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले अशा दोन नावांवर चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. यावर पक्षश्रेष्ठींनीही नगरच्या जागेवरील दावा सोडलेला नसल्याचे कार्यकर्त्यांना ठामपणे सांगितले.

नगरची जागा राष्ट्रवादीकडेच ठेवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे पक्षनेत्या सुनेत्रा पवार यांना सांगितले. त्यांनी, तसेच समन्वय समितीतील हसन मुश्रीफ यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रवादीने दावा सोडलेला नाही. कपिल पवार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles