माजी महापौर संदीप कोतकर भाजपच्या वाटेवर
विधान परिषदेच्या अहिल्यानगरच्या जागेसाठी पुण्यात खलबते : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका, १ जून अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
अहिल्यानगर- विधान परिषदेसाठी भाजपकडून माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव पुढे आले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते व कोतकर यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाला, तर कोतकर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या जागेसाठी
जिल्ह्यातील दिग्गज नेते इच्छुक आहेत. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगरसेवक मतदार आहेत. दिवंगत अरुण जगताप दोनवेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते. ते जानेवारी २०२२ मध्ये निवृत्त झाले. तेंव्हापासून ही जागा रिक्त होती. चार वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. या जागेसाठी माजी आमदार प्राजक्त तनपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, माजी महापौर संदीप कोतकर, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नावाची चर्चा आहे. यातील माजी महापौर संदीप कोतकर यांचे जोरकसपणे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या
पत्नी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर विधानसभेची निवडणूक लढविणार होत्या. पण, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. महापालिका निवडणुकीतही ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी सुरुवातीला मोर्चेबांधणी केली. त्याही निवडणुकीत कोतकर यांनी माघार घेतली. सलग दोन निवडणुकांतून माघार घेतलेल्या कोतकर यांनी विधान परिषदेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक भाजपकडे आहेत. त्यामुळे विधान परिषदेची आमदारकी हवी असेल त्यांना भाजपात प्रवेश करावा लागेल. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनादेखील
मतदारांची जुळवाजुळवी करणारा बलवान उमेदवार हवा आहे. कोतकर यांच्याकडे तीच क्षमता आहे. त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोतकर यांच्याकडे विचारणा केल्याचे बोलले जाते. चर्चेची पहिली फेरी पुण्यात झाल्याची चर्चा आहे. राहूरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माजी आमदार तनपुरे यांनी माघार घेतल्याने अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. तनपुरे यांच्या त्यागाची परतफेड त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन भाजप करू शकतो, असाही एक सूर आहे. परंतु, तनपुरे यांच्याकडून भाजपला प्रतिसाद मिळताना दिसत नाही.


