ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. आता ग्रामीण भागातील लोकांना दुसरा गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ४५ दिवसांची वाट बघावी लागणार नाही. सरकारनं ग्रामीण भागातील एलपीजी रिफिल बुकिंगचा कालावधी कमी करून २५ दिवसांवर आणला आहे. यासोबतच आता शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी बुकिंगचा नियम एकसारखाच झाला आहे. पुरवठ्याची स्थिती सुधारल्याने आणि बॅकलॉग कमी झाल्यानंतर पेट्रोलियम मंत्रालयानं तेल कंपन्यांना तातडीने नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सोशल मीडियावर या निर्णयाबाबत माहिती दिली. आखाती देशांत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. पुरवठा मर्यादित आणि गॅस टंचाई भासू नये यासाठी त्यावेळी शहरांमध्ये २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांचा बुकिंगचा कालावधी निश्चित करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.


