जिंजी गडावर भगव्या जल्लोषात महाराष्ट्र दिन ;एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी मोहीम

जिंजी गडावर भगव्या जल्लोषात महाराष्ट्र दिन

‘आपला मावळा’च्या १४व्या टप्प्यात गडसंवर्धनाला ऐतिहासिक उंची

सीमापार एकात्मतेचा संदेश

अहिल्यानगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तामिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ला येथे ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने गडसंवर्धन, स्वच्छता आणि जतन मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली. खासदार नीलेश लंके लंके यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा हा १४वा टप्पा ठरला असून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या शिवप्रेमी मावळ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत इतिहास जतनाच्या कार्यात आपला वाटा उचलला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याशी ऐतिहासिक नाळ असलेला जिंजी किल्ला हा दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचा दुर्ग मानला जातो. पुढे छत्रपती राजाराम महाराज यांच्या संघर्षकाळात या किल्ल्याने तात्पुरत्या राजधानीचे स्वरूप धारण करत स्वराज्य टिकविण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर जिंजी गडावर गडसंवर्धनाची मोहीम राबविणे हे प्रत्येक मावळ्यासाठी अभिमानाचे आणि कर्तव्याचे कार्य ठरले.

मोहिमेदरम्यान गड परिसरात व्यापक स्वरूपात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. प्लास्टिक कचरा गोळा करणे, झाडाझुडपांची छाटणी व साफसफाई, ऐतिहासिक वास्तूंच्या परिसराची स्वच्छता राखणे, तसेच गडाच्या मूळ रचनेला हानी पोहोचवणारे घटक दूर करणे अशा विविध कामांमध्ये स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. गडकोटांचे संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या कृतीतून प्रभावीपणे देण्यात आला.

याप्रसंगी उद्योजक बळवंतराव जगदाळे,पी एम जी भास्कर,उद्योजक श्री.साळुंखे, पांडुरंग सुर्वे,शाहीर विजय तळेकर,आपला मावळाचे अध्यक्ष रामेश्वर निमसे,सचिव प्रा.सीताराम काकडे, मोईन काश्मिरी,योगिराज गाडे,सुधीर लकुडझोडे, निखिल निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चौकट

शिवगर्जनेने दुमदुमला गड

महाराष्ट्र दिन जिंजी गडावर साजरा करण्याचा संकल्प यावेळी पूर्णत्वास गेला. भगव्या झेंड्यांच्या साक्षीने आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी गड परिसर दुमदुमून गेला. राज्याच्या सीमांपलीकडे जाऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला.

चौकट

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा

गडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोहिमेला विशेष उंची दिली. मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिक, भरतनाट्यमचे सुरेख सादरीकरण तसेच शिवपोवाड्यांच्या जोशपूर्ण गजरात वातावरण भारावून गेले. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्या सांस्कृतिक परंपरांचा संगम घडवत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

चौकट

प्रवासादरम्यान जंगी स्वागत

अहिल्यानगर ते जिंजी या प्रदीर्घ प्रवासादरम्यान विविध ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी मावळ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. करमाळा येथे संतोष वारे व ग्रुप, सोलापूर येथे जीशान भाई शेख, विजापूर येथे शशिकांत पवार व ग्रुप, बेंगलोर येथे कांतीलाल अप्पा भोसले व ग्रुप तसेच जिंजी येथे भास्कर धनलक्ष्मी व मित्रपरिवार यांच्या वतीने खासदार नीलेश लंके व मावळ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतावेळी काही ठिकाणी स्वयंसेवकांसाठी भोजन व नाश्त्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. या सेवाभावामुळे संपूर्ण मोहिमेला आपुलकीचा आणि एकात्मतेचा भावनिक स्पर्श लाभला.

‘गडकोट जपणे हीच खरी देशसेवा’

यावेळी बोलताना खासदार नीलेश लंके यांनी, “गडकोट जपणे म्हणजे आपल्या इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान करणे होय. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशभरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिंजी किल्ल्यावर महाराष्ट्र दिन साजरा करताना स्वराज्याच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, हजारो मावळ्यांचा सहभाग हीच या चळवळीची खरी ताकद असून भविष्यातही अशा मोहिमा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहेत.

एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी मोहीम

‘आपला मावळा’ संघटनेच्या या उपक्रमातून गडसंवर्धनासोबतच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. विविध राज्यांतील लोकांनी एकत्र येत इतिहास जतनासाठी केलेले प्रयत्न हे समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक बंध अधिक दृढ करत गडकोट संवर्धनाची ही चळवळ देशव्यापी स्वरूप धारण करत असल्याचे चित्र या मोहिमेतून स्पष्ट झाले. गडकोट संवर्धनाच्या माध्यमातून समाजात जागर निर्माण करणाऱ्या या मोहिमेचा १४वा टप्पा यशस्वी ठरला असून पुढील काळात देशातील इतर ऐतिहासिक गडांवरही अशाच मोहिमा राबविण्याचा निर्धार ‘आपला मावळा’ संघटनेने व्यक्त केला आहे. इतिहास, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारी ही मोहीम भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles