नागपूर : उद्धव ठाकरे यांची वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही ठाकरेंच्या भेटीचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात काढले जात आहे. दोघांच्या भेटीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास येत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. ठाकरे बंधू भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरातून भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर भाष्य केलं. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आनंदाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले ही आनंदाची बाब आहे. यात राजकीय का पाहता? आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जाणं, यात राजकारण पाहणं योग्य नाही’.
‘महाराष्ट्रातल्या मनातलं काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसेल आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल. मात्र काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे, हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे असे म्हणणे योग्य नाही. हे फार मोठे विधान होईल, असे ते पुढे म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज त्यांचे मोठे बंधू असलेल्या उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर आले ही बाब राजकारणात चर्चेची ठरली आहे. तसंच या दोघांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो समोर काढलेला फोटोही चर्चेत आला आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासमोर मी नम्रपणे नतमस्तक होतो आहे.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सगळ्यांचे आभार मानले. त्यानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छांबाबत आणि मातोश्रीवर त्यांनी येण्याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला गेला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंना सकाळपासूनच शुभेच्छांचे मेसेज आणि फोन येत आहेत. दरम्यान त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येत त्यांना एक चांगलं सरप्राईज दिलं. यामुळे आपण आनंदी झाल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“राज आल्याने वाढदिवसाचा आनंद द्विगुणितच नाही तर कित्येक पटीने गुणित झाला आहे. पुढचं सगळं काही चांगलं होईल याचा मला विश्वास आहे. अनेक वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र भेटलो. ज्या घरात एकत्र राहिलो, वाढलो तिथे आम्ही गेलो. ज्यांनी आम्हाला वाढवलं त्या बाळासाहेबांपुढे नतमस्तक झालो. बऱ्याच वर्षांनी राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे कित्येक पटीने मला आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही बाब फारच महत्त्वाची आहे.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंन या भेटीबाबत एक पोस्टही केली आहे.


