हिंगोली: राज्यात महायुतीमधील काही मंत्र्यांमध्ये खांदेपालट होणार असून काहींची विकेट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधून याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केल्याने मंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे, कृतीमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाचा हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी माणिकराव कोकाटे यांचं कौतुक केलंय. तसेच, मंत्री होण्यासाठी इच्छुक आहे, आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून काम करायला आवडेल, असेही आ. बांगर यांनी म्हटलं.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषि खातं काढून घेतलं जाणार आहे, तसेच त्यांचा राजीनामा देखील होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात विचारले असता, माणिकराव कोकाटे रमी खेळत नव्हते, त्यांचा व्हिडिओ क्रॉप केलेला आहे. अलिकडच्या काळात कुणीही काहीही क्रॉप करुन बनवत आहेत. माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री आहे, असेही आमदार बांगर यांनी म्हटले. श्रावण मासारंभास आजपासून सुरुवात झाली असून 4 ऑगस्ट रोजी आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा निघणार आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला. त्यावेळी, ही भोलेनाथाची कावड असते, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे या कावड यात्रेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती बांगर यांनी दिले. शिवसैनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एनी-टाईम तयार असतात. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदे साहेबांचा आदेश सर आखो पर असतो. निवडणुकीचे रणशिंग फुंकलेलच आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही फडकवणार आहोत, असेही बांगर म्हणाले.
मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये कोणते फेरबदल होणार आहेत, याची मला माहिती नाही. पण, जर पक्षाने जबाबदारी दिली तर मंत्रिपद कुणाला नको असते, मी सुद्धा एक आमदार म्हणून काम करतोय. आमदार कशा पद्धतीने काम करतोय हे तुम्ही दाखवता. परंतु, मंत्री झाल्यानंतर मंत्री कसा असावा हे महाराष्ट्रातील जनतेला आम्ही दाखवून देऊ, असे म्हणत संतोष बांगर यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली. मला जर मंत्रीपदाची जबाबदारी दिली, तर आरोग्य विभागाचे काम करण्याची संधी द्यावी, असेही ते म्हणाले.


