*आमदार सत्यजित तांबे यांचेकडून शिक्षण विभागाची झाडाझडती*
*प्रलंबित प्रश्नांबाबत कालावधी निश्चित करण्याच्या सूचना*
नगर – नाशिक पदवीधर विभागाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काल जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन अनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली .दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी विहित वेळेमध्ये प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत अशा सूचना त्यांनी केल्या. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या मासिक टूरचा अहवाल सादर करण्याचे आदेश देतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला भेटी देऊन तालुकास्तरावरील प्रश्न गटविकास अधिकाऱ्यांच्या सोबतीने निकाली काढावेत असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार तांबे यांच्या या आढावा बैठकीत अनेक तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार उघडा पडला.प्रशासनामध्ये सुसूत्रता नसल्याने छोटे छोटे प्रश्न प्रलंबित राहिल्याचे दिसून आले.संगमनेर चे गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत कोणी ही चर्चा केली नाही असा चिमटाही त्यांनी उपस्थित शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काढला.
काल दुपारी सुरुवातीस माध्यमिक विभागाच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आढावा बैठक पार पडली यावेळी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके,प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे कक्ष अधिकारी संभाजी भदगले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .
प्राथमिक विभागाच्या आढावा बैठकीत आमदार तांबे यांनी विविध प्रश्नांचा उहापोह केला.
निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी,पदवीधर वेतनश्रेणी,पदोन्नती,बी एल ओ,नैसर्गिक वर्ग वाढ, मेडिकल बिले,विस्तार अधिकारी प्रमोशन,मिशन आरंभ योजना,निलंबन प्रस्ताव,थकीत बिले यासारख्या अनेक प्रश्नांवर उपस्थित शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.प्रत्येक प्रश्नाचा सखोल आढावा घेताना प्रशासनाकडून त्यांची बाजू मांडण्यात आली.
यावेळी उपस्थित अनेक गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाही.श्रीमती साईलता सामलेटी व शिवाजी कराड या दोन गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील प्रश्नाबाबत अभ्यासपूर्वक उत्तरे दिली. इतर गट शिक्षणाधिकाऱ्यांना मात्र उत्तरे देताना दमछाक झाली. कर्जतचे गटशिक्षण अधिकारी आपल्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला विचारून उत्तरे देत असल्याचे या वेळी दिसून आले.संगमनेरच्या गटशिक्षणाधिकार्यांनी निवड समितीचे प्रस्ताव दीड वर्षापासून प्रलंबित ठेवल्याने आमदार तांबे चिडले व त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आधी यांच्यावर कारवाई करा अशी सूचना केली.
उर्दू माध्यमाच्या विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचे प्रमोशन तसेच मिशन आरंभ ची मार्गदर्शक पुस्तिका उर्दू भाषेत उपलब्ध करून देण्याची शिक्षक नेते सलीमखान पठाण यांनी केलेली मागणी यावेळी मान्य करण्यात आली.
शिक्षण अधिकारी यांनी दर आठवड्यातून दोन दिवस तालुका पंचायत समितीच्या कार्यालयांना भेटी देऊन तालुकास्तरावरील प्रश्न संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तालुकास्तरावर निकाली काढण्याचे कार्य होत नसल्याने प्रलंबित प्रश्न वाढल्याचे सांगून शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या मागील सहा महिन्याच्या टूरचा अहवाल द्यावा असे सांगितले. अनेक प्रश्नांच्या बाबत प्रशासनातील समन्वय नसल्याने प्रलंबित असल्याचे यावेळी दिसून आले.
शिक्षकांकडून वारंवार माहिती मागवू नका.तुमच्याकडे असलेल्या डेटा बँकेचा माहिती देण्यासाठी वापर करा.डेटा बँक अद्यावत करा.निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी चे अधिकार खाली तालुकास्तरावर देऊन ही प्रस्ताव प्रलंबित आहेत. हे सर्व काम एका महिन्यात झाले पाहिजे व ४५ दिवसात हा विषय संपला पाहिजे असे ते म्हणाले.
अपंगांच्या तपासणी बाबत खोटे अपंगांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी सांगितले,या प्रश्नावर जे खरे अपंग आहेत त्यांना वारंवार तपासणीला पाठवू नका तसेच संशयित अपंगांची वेगळी यादी करा असे आमदार तांबे म्हणाले.
नैसर्गिक वर्ग वाढ व दर्जा वाढीच्या प्रश्नाबाबत प्रशासनात ताळमेळ नसल्याचे यावेळी दिसून आले.
समग्र शिक्षा अभियानाचे अनुदान पी एफ एम एस प्रणाली द्वारे न करता मुख्याध्यापकाच्या खात्यावर देऊन मुख्याध्यापकांना खर्च करण्याचे अधिकार देण्याची मागणी यावेळी करण्यात आली त्याबाबतही सुयोग्य विचार करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी दिले.
या बैठकीत बी एल ओ बाबत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी जळगावमध्ये अंमलात आणलेली कार्यपद्धती आपल्या जिल्ह्यातही लागू करण्याचे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले.
शिक्षक नेते राजेंद्र निमसे यांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. याबाबत त्यांनी केलेले तक्रारीवर ग्राम विकास मंत्र्यांनी जिल्हा परिषदेकडे तातडीने अहवाल मागवला असता पाच महिने झाले तरी हा अहवाल पाठवण्यात आला नाही.याबाबत जिल्ह्यातील एका आमदाराने पत्र देऊन देखील त्याची जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही.माझे पत्र असते तर मी आत्तापर्यंत या अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला असता असा इशारा देऊन सदर अहवाल तातडीने ग्राम विकास मंत्र्यांना पाठवण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले.
मी जिल्हा परिषदेचा दहा वर्षे सदस्य राहिलो आहे. त्यामुळे मला या प्रश्नांची जाण आहे. ज्यावेळी तुम्ही प्रशंसा करता त्यावेळी मला भीती वाटते असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी चर्चेत आलेल्या अनेक प्रश्नांवर सहमती दर्शवीत उपस्थित शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना उचित कारवाईचे निर्देश दिले.उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नाबाबत निर्णय झाल्याचे त्यांनी मान्य केले.आवश्यक प्रश्नाबाबत संघटनेने सूचना लेखी द्याव्यात त्यावरही विहित वेळेत कार्यवाही होईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी झालेल्या विविध प्रश्नांच्या चर्चेत विविध शिक्षक संघटनांचे नेते सर्वश्री.रावसाहेब रोहकले,सलीमखान पठाण,बापूसाहेब तांबे,प्रवीण ठुबे,अविनाश निंभोरे, आबासाहेब जगताप, बबनदादा गाडेकर,राजेंद्र जायभाय,नवनाथ अडसूळ, विकास डावखरे,प्रकाश नांगरे,राजेंद्र ठोकळ,नारायण पिसे,संजय धामणे,शरद कोतकर यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला.
शेवटी अविनाश निंभोरे यांनी आभार मानले.
*इच्छा नसताना पुरस्कार द्यावे लागले*
जिल्हा परिषदेमार्फत शिक्षक दिनी दिले जाणारे पुरस्कार पाच सप्टेंबरला दिले जावे, गेली दोन वर्षे हे पुरस्कार दिलेले नाही असा प्रश्न उपस्थित केला असता मागील दोन व यावर्षीचे असे तीन वर्षांचे पुरस्कार आपण या वर्षी देणार आहोत.यामध्ये लेखी परीक्षा घेऊन आपण शिक्षकांना पुरस्कार देतो. यावर्षी काही शिक्षकांना अतिशय कमी मार्क मिळालेले असल्याने इच्छा नसताना त्यांना पुरस्कार द्यावे लागले अशी खंत मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी व्यक्त केली.
*आमदार तांबे यांना मंत्री करा*
आमदार सत्यजित तांबे हे तरुण असून त्यांचा प्रत्येक विषयाचा दांडगा अभ्यास आहे.विशेषतः शिक्षण खात्यातील सर्व प्रश्नांवर त्यांना सखोल माहिती असल्याने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग राज्याला होण्यासाठी त्यांना मंत्रीपद देण्यात यावे.
*सलीमखान पठाण*
माजी चेअरमन, शिक्षक बँक.


