महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची मोठी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याचं बोललं जात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हे ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून सर्व खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला होता. पण, व्हिप जारी केल्यानंतरही या सहा खासदारांपैकी एकही खासदार पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आता हे ६ खासदार फुटल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र, या सहा खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीची सर्वात जास्त चर्चा होत आहे.
या चर्चेचं कारण म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी याआधी निष्ठेबाबत अनेक भाषणं केली होती. त्यामुळे त्यांना यावरून ट्रोलही केलं जात आहे. बंडखोरीच्या चर्चानंतर ओमराजे निंबाळकर यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. ‘उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, हे समजू शकतो. पण किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं. पण दुर्दैवाने असं झालं नाही’, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या त्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज (२० जून) ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत भाष्य केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत आपण काहीही बोललो नाही आणि भविष्यातही काही बोलणार नाही”, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत मी कोणत्याही प्रेसमध्ये अजिबात काहीही बोललेलो नाही. एक लक्षात घ्या, माझी राजकीय भूमिका काहीही ठरली तरी मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत याआधीही कधी काही बोललो नाही, आणि भविष्यात देखील काही बोलणार नाही. मग माझी राजकीय भूमिका काहीही असली तरीही काही बोलणार नाही”, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे, त्यामुळे आता पक्षांतर करण्याचा निर्णय बदलणार का? असा प्रश्न ओमराजे निंबाळकर यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “मी मतदारंसघात जाऊन सर्वांशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेणार आहे. माझा अंतिम निर्णय झालेला नाही. मला आपल्याला इतकच सांगायचं की, मी माझ्या लोकांबरोबर चर्चा करुन माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून निर्णय घेईल.”


