राजकीय नेत्यांच्या सततच्या दौऱ्यांमुळे अल्प वेळेत अधिकाधिक सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी हेलिकॉप्टर व छोट्या विमानांचा वापर वाढला आहे. मात्र, अशा प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली संपूर्ण तांत्रिक तपासणी केली जाते का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
कोणतेही विमान किंवा हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापूर्वी त्याची सखोल तांत्रिक तपासणी, वैमानिकांचे लॉगबुक, हवामान अहवाल आणि देखभाल नोंदी तपासल्या जाणे अत्यावश्यक आहे. संबंधित घटनेच्या वेळी ही सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पाळली गेली होती का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.
डॉ. नितीन राऊत हे स्वतः वैमानिक प्रशिक्षण घेतलेले असून त्यांनी विमान उड्डाण व सुरक्षिततेसंदर्भातील अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय नेत्यांना आवाहन केले की, वेळेच्या दबावाखाली सुरक्षिततेशी तडजोड न करता प्रत्येक उड्डाणापूर्वी सर्व तांत्रिक बाबींची खात्री करूनच प्रवास करावा. कोणतीही शंका राहणार नाही, यासाठी पारदर्शक चौकशी होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


