बीडच्या नगरसेविकेच्या पतीने बीएलओ म्हणून काम करणाऱ्या एका शिक्षकाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका राजकीय नेत्याचं कार्यालय पेटवल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्यालयाला पेटवण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जुन्या वादातून नेत्याचं कार्यालय पेटवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. आता या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या वडवणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय जमाले यांचं जनसंपर्क कार्यालय पेटवल्याची माहिती हाती आली आहे. एकाने जुन्या वादातून कार्यालय पेटवल्याचा आरोप जमाले यांनी केला आहे. कार्यालयात ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावून आरोपी पळाल्याचं समो आलं आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आह. या आगीत महत्त्वाचे कागदपत्रे, कॉम्प्युटर, प्रिंटर आणि फर्निचर जळून खाक झालं आहे. या घटनेत 2 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे.जमाले यांच्या तक्रारीवरून मोहनसिंग टाक याच्याविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दत्तात्रय जमाले यांच कार्यालय पेटवल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जमाले यांच्या समर्थकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. आता या प्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाईल, हे पाहावे लागेल.
काही दिवसांपूर्वी बीडमध्ये बीएलओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण झाल्याची घटना घडली. ही मारहाण एका नगरसेविकेच्या पतीने केल्याची माहिती मिळत आहे. शिक्षकाला मतदान नोंदणीचा फॉर्म भरून देण्याच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बीड शहर पोलीस ठाण्यात नगरसेविकेच्या पतीविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण, जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


