कर्जतला होणार नवे शेतकरी भवन
1 कोटी 62 लाखाच्या खर्चास मान्यता
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे कर्जत येथे नवे शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. यासाठीच्या 1 कोटी 62 लाख 41 हजार 516 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या खर्चापैकी 76 लाख 46 हजाराचे अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. राहिलेली रक्कम कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वनिधी वा कर्जाच्या माध्यमातून उभी करावी लागणार आहे. याशिवाय या शेतकरी भवनाचा दैनंदिन खर्च, देखभाल दुरुस्ती, मनुष्यबळावरील खर्च, वीज व पाणी देयकांवरील खर्च कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीला करावा लागणार आहे. शेतकरी भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यात येणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी तसेच शेतकर्यांच्या मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही, तेथे नवीन शेतकरी भवन बांधणे तसेच ज्या बाजार समितीच्या परिसरात शेतकरी भवन अस्तित्वात आहे. पण ते सुस्थितीत नाही, अशा शेतकरी भवनाची दुरुस्ती करण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी19 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पुणे येथील पणन संचालकांनी सादर केलेल्या कर्जत कृषि उत्पन्न बाजार समिती येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या एकूण रु. 1 कोटी 62 लाख 41 हजार 516 रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता कर्जत कृषि उत्पन्न बाजार समिती (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथे नवीन शेतकरी भवन बांधण्यात येणार आहे.
कर्जतच्या नव्या शेतकरी भवनास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता हे भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेबाबतच्या मूळ शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार उभारावे लागणार आहे. या शेतकरी भवन बांधकामाच्या अंदाजपत्रकास पणन संचालनालयात कार्यरत असलेल्या उप अभियंता (स्थापत्य), सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तांत्रिक मान्यता (टेक्निकल सॅक्शन) द्यावी व विहित कार्यपध्दतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्जत बाजार समितीच्या सचिवांनी या बांधकामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जि. अहिल्यानगर यांना सादर करायचा आहे. दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या 1 कोटी 52 लाख 91 हजार किमतीच्या मॉडेलपेक्षा कर्जत कृषि उत्पन्न बाजार समिती या अ वर्गातील बाजार समितीने तयार केलेले रु.1 कोटी 62 लाख 41 हजार 516 रुपयांचे अंदाजपत्रक जास्त किमतीचे असल्याने, त्यांना शासनाने निश्चित केलेल्या मॉडेलनुसार 1 कोटी 52 लाख 91 हजार रकमेच्या 50 टक्केप्रमाणे 76 लाख 46 हजार रुपये इतके शासन अनुदान दिले जाणार आहे. बाजार समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकातील उर्वरित निधी बाजार समितीने स्वनिधी वा कर्ज या माध्यमातून उपलब्ध करुन बांधकाम करणे बंधनकारक आहे. बाजार समितीस मिळणारे अनुदान दोन टप्प्यात वितरित होणार आहे. या शेतकरी भवनाचा दैनंदिन खर्च, देखभाल दुरुस्ती, मनुष्यबळावरील खर्च, वीज व पाणी देयके या वरील खर्च हा कर्जत बाजार समितीने करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारे निधी उपलब्ध करुन दिला जाणार नसल्याचेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


