Operation लोकशाही…. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे , मला ही लोकशाही वगैरे …

‘कलम’नामा….
Operation लोकशाही….
संपादकीय सचिन कलमदाणे
हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, “मला ही लोकशाही वगैरे अजिबात पटत नाही…”
आज दुर्दैवाने त्यांच्याच शिवसेना पक्षाची वाताहत अतिशय वेगाने होत आहे. आयाराम गयाराम प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी घटनेत पक्षांतर बंदी कायदा समाविष्ट करण्यात आला. ज्या राजकारण्यांनी कायदा केला तेच त्यातून पळवाटा काढून पक्ष फोडाफोडी करत कायद्याला वाकुल्या दाखवत आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडे हेच चालू आहे. आज विरोधात राहुन संघर्ष करायला कोणी तयार नाही. सगळ्यांना सत्तेची ऊब हवी आहे. त्यामुळे येनकेन प्रकारे सत्ताधारी गटात सामील होण्यासाठी प्रयत्न करायचे. आपल्याला कधी बोलावणं येतं याची वाट पाहिली जाते.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले तेव्हा पासूनच ते फार काळ पक्षात राहणार नाहीत. ते सत्ताधारी गटात जातील हे सूर्य प्रकाशा इतके स्पष्ट होते. एकीकडे ‘महाशक्ती’ आणि दुसरीकडे क्षीण झालेली शक्ती यात खासदारांनी महाशक्ती निवडली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दारूण पराभव झाला आणि त्यांचेही खासदार महाशक्तीकडे आकर्षित झाले. आता बहुधा उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या खासदारांचा नंबर लागू शकतो. (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदारही हमारा नंबर कब आयेगा ? म्हणून वेटिंगवर असतीलच) महाराष्ट्रात ‘मशाल’ विझत चाललीय आणि ‘तुतारी’त फुंकणाऱ्यांना गालफुगी झालीय. नशीब तामिळनाडूच्या विजय थलपतिकडे खासदार नाहीत.
आयते निवडून आलेले खासदार सामील होत असल्याने भाजपला संसदेत मतदार संघ पुनर्रचना विधेयक मंजूर करणे सोपे जाईल. तसेच इतर अनेक घटना दुरुस्ती विधेयकं मंजूर होण्यास मदत होईल. राज्यसभेत ‘आप’च्या फुटीमुळे संख्याबळ वाढलेलं आहेच.
२०२९ पर्यंत भाजप आपला अजेंडा बरोबर सेट करून घेईल. त्यांना माहीत आहे त्यांचे सहयोगी असलेल्या प्रादेशिक पक्षांना फक्त संबंधित राज्यातील सत्तेत रस आहे.‌ महाशक्तीला केंद्राच्या सत्तेत रस आहे.
या सर्व राजकीय खेळात (ऑपरेशन) लोकशाहीतील लोकांच्या मताला शून्य किंमत राहिली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जाहिराती करून आवाहन करण्यात येते. तुमच एक मत देश बदलेल असं सांगितलं जातं. पण इथं ज्याला मत दिले तो स्वतःच मत कधी बदलेल हे सांगता येत नाही. लोकांनी विशिष्ट पक्षाचा उमेदवार निवडून दिला म्हणजे तो विजयी उमेदवार पाच वर्षे त्याच पक्षाचा राहिल याची गॅरंटी राहिली नाही. सगळ्यांना महाशक्ती आवडते. यात अनेक जण महाशक्तीच्या रणनितीचे कौतुक करतील पण ही रणनीती नसून फक्त लालूच दाखवून आपली ताकद वाढवणे आहे.
सध्या एखाद्या राजकीय पक्षाच्या फुटीला ऑपरेशन अमुक तमुक नाव दिले जाते. पण खरं तर देशात ऑपरेशन लोकशाही सुरू आहे.
येत्या काळात शालेय शिक्षणातील नागरिक शास्त्राचे पुस्तक बदललं तर बरं होईल. मुलांना संसदीय लोकशाही, मतदान, बहुमत, सरकार स्थापना शिकवली जाते. सध्याचे राजकीय चित्र पाहून मुलांना आपण जे शिकतोय ते कोणत्या तरी दुसऱ्या देशातील राजकीय व्यवस्था आहे असच वाटेल..

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles