कुणाची तरी जिरवायची होती म्हणून लोकसभा लढलो, पण २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत खा. नीलेश लंके यांचा पुढचा प्लॅन

२०२९ ची विधानसभा मीच लढणार

खासदार नीलेश लंके यांची घोषणा

लंके यांचा झंझावाती तालुका दौरा

पारनेर : प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्याचा झंझावाती दौरा सुरू केला असून, या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना थेट मार्गदर्शन करत निवडणूक रणधुमाळीचा बिगुल फुंकला आहे.

पारनेर शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजीत खा. लंके यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर ढवळपुरी व टाकळी ढोकेश्वर गटात बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.

यावेळी बोलताना खा. लंके यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढविली; मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे.” तसेच, सन २०२९ मध्ये मुंबईत सक्रिय राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. “ज्या ठिकाणी अन्याय होईल, तिथे संघर्ष करा, धाक निर्माण करा आणि गरज पडल्यास आंदोलन करा. निवडणुका संपल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही, त्यामुळे गावोगाव संघटित होऊन जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करा,” असे आवाहन त्यांनी केले.

“कार्यकर्ता हा रेसच्या घोड्यासारखा असला पाहिजे. मी आजही २०-२० तास काम करतो,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना अधिक जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले. आगामी निवडणुकांसाठी लक्ष्य निश्चित करताना त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच किमान ८५ ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठी बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या मरगळीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “झाले गेले गंगेला मिळाले. नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेने कामाला लागा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

आपल्या कार्याचा आढावा देताना खा. लंके यांनी सांगितले की, मतदारसंघात २ हजार कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली असून १ लाख ५१ हजार नागरिकांना वैयक्तिक मदत देण्यात आली आहे. तसेच, रुग्णालयातील गरजू रुग्णांची दरमहा १५ ते २० लाख रुपयांची बिले माफ करून देण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीतून मोठ्या प्रमाणावर मदत मिळवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

युवकांसाठी उद्योग शिबिरे, रोजगार प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, अपंगांना सक्षम बनविणे अशा विविध उपक्रमांची माहिती देत “मी राजकारण करत नाही, समाजकारण करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. ढवळपुरीचे माजी सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी तरुणांच्या उत्साहाचे कौतुक करत बुथनिहाय प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर यांनी संघटन मजबूत करण्यासाठी दरमहा गटानिहाय बैठका घेण्याचा निर्णय जाहीर केला. बाबाजी तरटे यांनी ३६५ बुथवर बीएलए नेमणुकीवर भर देण्याचे सांगितले, तर अर्जुन भालेकर यांनी आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. गंगाराम बेलकर यांनी दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे नमूद केले.

यावेळी मोहन रोकडे यांनी “या दौऱ्यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे,” असे सांगत आगामी निवडणुकीत विजयाचा निर्धार व्यक्त केला. याशिवाय पोपट गुंड, अशोक घुले, सोनिया राजदेव, भरत आंधळे, अभिजित झावरे, प्रकाश राठोड, संदीप ठाणगे, बापूसाहेब शिर्के आदींनीही आपली मते मांडली.

टाकळी ढोकेश्वर येथे पुष्पवृष्टीत स्वागत झाल्यानंतर कर्जुले हर्या येथे मेळावा पार पडला. खा. लंके यांची रॅली टाकळीच्या बाजारपेठेतून जात असताना व्यापाऱ्यांनी दुकान बाहेर येत लंके यांचे स्वागत केले. छायापुढील काळात प्रत्येक गटात जाऊन बैठका घेऊन स्थानिक प्रश्न, संघटन बांधणी आणि निवडणूक रणनीती यावर सखोल चर्चा केली जाणार आहे.

या प्रसंगी संभाजी रोहोकले, विकास
रोहोकले, ॲड राहुल झावरे, लाला भोंडवे, कांतिलाल भोसले, अमोल यादव, रवींद्र राजदेव, रविंद्र गायखे, अजित भाईक, गणेश मधे, भागजी गावडे, अभयसिंह नांगरे, चंद्रभान ठुबे, डॉ. संतोष गुंजाळ, गंगाराम उंडे, डॉ. बाळासाहेब कावरे, नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे, उपनगराध्यक्ष सुप्रिया शिंदे, दिपाली औटी, विकास रोहोकले, योगेश मते, राजू शेख, विजय डोळ, रा या औटी, प्रकाश गाजरे, रामदास दाते, अमोल उगले, दत्ता निवडूंगे, सचिन पठारे, प्रकाश गुंड, आप्पासाहेब शिंदे, सुखदेव चितळकर, राजू रोडे, राजू शिंदे, दादा सुंबे, शिवाजी लावंड, बाळासाहेब हिलाळ, रामा तराळ, अनिल गंधात्ते, भाऊ निवडुंगे, श्रीरंग रोकडे, चंदू खेमनर, संजय रोकडे, दीपक लंके आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles