मुकुंदनगरमध्ये तरुणावर चाकूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुकुंदनगरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील मुकुंदनगर भागात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर आणि त्याच्या भावावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

​साहिल मेहमुद देशमुख या २२ वर्षीय मजुरी करणाऱ्या तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मुकुंदनगरमधील मोठी मशीद परिसरात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी साहिल आणि त्याचा भाऊ परिसरात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.​यावेळी आरोपी सलीम अनिस शेख आणि जुनेद इनामदार यांनी आपल्याजवळील चाकूने साहिलच्या डाव्या खांद्यावर आणि बरगडीवर वार करून त्यास गंभीर जखमी केले. ‘आमच्यामध्ये पडलात तर तुम्हाला जिवंत मारून टाकू,’ अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली. या हल्ल्यात फिर्यादीचा भाऊ देखील जखमी झाला असून त्यांच्यावर पॅसिफिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​या घटनेप्रकरणी पोलिसांनी सलीम अनिस शेख, सना सलीम शेख (दोघे रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) आणि जुनेद इनामदार, राजू इनामदार (दोघे रा. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर या घटनेचा अधिक तपास करत असून, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles