शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १,८१७ कोटी जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी तारकेश्वर (जि. हुगळी. पश्चिम बंगाल) येथे झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आला. राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे १,८१७ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कृषिमंत्री भरणे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपये इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत २२ हप्त्यांद्वारे सुमारे ४१,०८३ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्यात राज्यातील भूमी अभिलेख अद्ययावत, आधार संलग्न बँक खाते व ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे १,८१७ कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले होते. केंद्र शासनाने २० जून हा दिवस देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा केला.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात २३ व्या हप्त्याचा लाभ थेट जमा करण्यात आला असून यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर वितरित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांतर्फे आभार व्यक्त करतो.”

पीएम किसान योजेनेचे सर्वाधिक लाभार्थी असलेले पहिले पाच जिल्हे
अहिल्यानगर (लाभार्थी 5,45,481 व एकूण रक्कम 109.32)
सोलापूर (लाभार्थी 4,94,447 व एकूण रक्कम 98.89)
कोल्हापूर (लाभार्थी 4,60,687 व एकूण रक्कम 92.19)
सातारा (लाभार्थी 4,36,055 व एकूण रक्कम 87.22)
पुणे ( लाभार्थी 4,30,519 व एकूण रक्कम 86.10)
नाशिक (लाभार्थी 4,26,540 व एकूण रक्कम 85.34)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles