शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा शनिवारी (दि. 5) मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावरून मंत्री नितेश राणे यांनी ‘जिहादी सभा’ असा उल्लेख केला होता. आता यावरून मनसे नेते प्रकाश महाजन आणि अविनाश जाधव यांनी नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केलाय.
हा कधी हिंदूंचा नेता झाला? हा तर संघाला हाफ चड्डीवाले म्हणत होता, हा कधी झाला, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. तर अविनाश जाधव म्हणाले की, नितेश राणे हे काल-परवा हिंदू झालेले आहेत. 2014 च्या आधी तेच टोपी घालून फिरायचे. ज्या माणसांनी त्यांना निवडून आणलं, त्यांनाच ते आम्हाला मारायला सांगत आहेत. तो माणूस उद्या हिंदू लोकांना का नाही मारायला सांगणार? त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. हा काल-परवा हिंदू झालेला माणूस आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याबाबत विचारले असता अविनाश जाधव म्हणाले की, वीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्र इच्छा होती की, दोन भाऊ एकत्र व्यासपीठावर यावे. महाराष्ट्रासाठी काहीतरी वेगळं करावं, मराठी माणसासाठी काहीतरी वेगळं करावं. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा पूर्ण होत आहे. हा आनंदाचा क्षण आमच्या डोळ्यात टिपण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. मी खात्रीने सांगतो की, आजपासून मराठी माणसाला एक वेगळी दिशा मिळेल आणि उद्यापासून नवीन महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल.
आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा
आजचा मेळावा हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची नांदी आहे का? असे विचारले असता अविनाश जाधव म्हणाले की, हे सगळं खूप पुढे आहे. आता ज्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलोय ती म्हणजे भाषा. आज माय मराठीने या दोन भावांना एकत्र आणले आहे. त्याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नसू शकते. युती आणि आघाडी हे सगळं पुढे होत राहील. परंतु, आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे त्यांनी म्हटले.


