ताजनापुर उपसा सिंचन योजनेत 13 गावे समाविष्ट करण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव
जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत सूचना : आमदार मोनिका राजळे
शेवगाव संदीप देहाडराय प्रतिनिधी –
शेवगाव तालुक्यातील ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. 1 या बंदस्थितीत असलेल्या योजनेच्या शिल्लक पाण्यातून पूर्व भागातील दुष्काळग्रस्त व टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी 13 गावे या योजनेत समाविष्ट करून प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव डिसेंबर अखेरपर्यंत सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर आमदार राजळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून जलसंपदा मंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत योजनेच्या कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल व 2 जून रोजी झालेल्या उपसमिती व स्थायी समितीच्या बैठकीनंतर या नवीन संकल्पनेची कामे प्रगतीपथावर आहेत. मंत्री विखे यांनी डिसेंबर अखेरपर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
तसेच बोधेगाव–बालमटाकळी व कोरडगाव परिसरातील गावांच्या मागणीनुसार सर्वेक्षण करून किती पाणी उपलब्ध होऊ शकते, याचा तांत्रिक व आर्थिक अहवाल महामंडळ कार्यालयाने सादर करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
या निर्णयामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खरडगावसह 13 गावांना ताजनापुर उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.


