पुण्यातील भाजपाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून माघार; मुख्यमंत्री फडणवीसांवर नेमकं काय म्हणाल्या होत्या?

पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. २ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. भाजपाने याठिकाणी पूजा मोरे – जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र दोन दिवसांपासून त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झाले. अनेकांनी त्यांची जुनी विधाने पुन्हा व्हायरल करून थेट भाजपा पक्षश्रेष्ठींना जाब विचारला. आपल्या विधानांचा विपर्यास केल्याचे पूजा मोरे यांनी सांगूनही ट्रोलिंग न थांबल्यामुळे आज अखेर पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले.

पूजा मोरे-जाधव यांचे पती धनंजय जाधव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, आम्ही सोशल मीडियाचे बळी ठरलो आहोत. माझ्या पत्नी पूजा मोरे यांनी जे विधान केले नाही, ते शब्द तिच्या तोंडी घातले गेले. मराठा आरक्षण आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल केलेले विधान पूजा मोरे यांनी केलेले नव्हतेच. तसेच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या विधानाबाबत माझ्या पत्नीने तेव्हाच स्पष्टीकरण दिले होते.

मुळच्या बीडमधील गेवराई तालुक्यातील असलेल्या पूजा मोरे लग्नानंतर पुण्यात आल्या. लग्नापूर्वी त्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होत्या. मूक मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. याच आंदोलनात एकेठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत विधान केल्याचा दावा काही सोशल मीडिया हँडल्सवरून करण्यात आला होता. मात्र हे विधान त्यांचे नव्हते, असा दावा पूजा मोरे यांनी केला आहे.

“मुख्यमंत्री फडणवीस आम्ही आरक्षण मागतो, तुमची पत्नी मागत नाहीत”, अशा प्रकारचे विधान मी केलेलेच नव्हते. हे विधान करणारी बीडच्या परळीतील एक तरूणी होती, असा दावा पूजा मोरे यांनी केला आहे. मात्र आरोपामुळे मला खूप त्रास झाला, असेही त्या म्हणाल्या.

२२ एप्रिल २०२४ रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पूजा मोरे यांनी एक विधान केले होते. याचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. हल्ला झाल्यानंतर पूजा मोरे काश्मीरमध्ये होत्या. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत, असे म्हटले होते.

मात्र हा व्हिडीओ मोडतोड करून दाखविण्यात आला असल्याचा दावा त्यांनी आता केला आहे. हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी काश्मीरमध्ये प्रयत्न केले होते. यावेळी बोलत असताना त्यांचे विधान अर्धवट दाखवले गेल्याचे त्या म्हणाल्या. याबाबत त्यांचा सविस्तर खुलासा करणारा एक व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.

लग्नानंतर काश्मीरला आम्ही फिरण्यासाठी गेलो होतो. तिथे हल्ला झाल्याचे कळताच आम्ही इतर जोडप्यांप्रमाणे हॉटेलच्या रुममध्ये बसलो नाहीत. आम्ही रस्त्यावर उतरून लोकांची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील पर्यटकांना दिलासा दिला आणि धार्मिक तणाव पसरू दिला नाही. हल्ला झाल्याच्या काही तासानंतर त्यातील खरी माहिती समोर आल्यानंतर अतिरेक्यांनी धर्म विचारूनच गोळ्या झाडल्याचा पुनरुच्चारही मी केला होता. मात्र माझ्या त्या विधानाकडे दुर्लक्ष करून आधीचाच व्हिडीओ व्हायरल केला गेला, असे पूजा मोरे यांनी साश्रू नयनांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles