मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतली यशवंतराव गडाख यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी अचानकपणे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या नगर शहरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले असले तरी सुजय विखे यांनी गडाख आमचे राजकीय विरोधक असले तरी कौटुंबिक विरोध होत नाहीत त्यांचे आमचे नातेसंबंध आहेत असे स्पष्टीकरण दिले आहे. असे असले तरी यशवंतराव गडाख व राधाकृष्ण विखे यांची ही भेट प्रदीर्घ कालावधीने झाल्याने राजकीय चर्चा सुरूच आहे.

विशेष म्हणजे सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. येत्या काही दिवसातच निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करणारे भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव गडाख यांची भेट घेतली होती. त्या पाठोपाठ विखे पितापुत्रांनीही भेट गडाख यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

यशवंतराव गडाख हे सहकारातील मातब्बर नेते तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे चिरंजीव माजी मंत्री शंकरराव गडाख हेही बँकेचे माजी संचालक आहेत. शंकरराव गडाख पूर्वी अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. नंतर ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे गटात सहभागी होऊन मंत्री झाले होते.सुजय विखे या भेटीला नातेसंबंधांचा दाखला देत असले तरी गडाख- विखे भेटी मागे राजकीय वैमन्यशाचेही कारण आहे. त्यातूनच गडाख-विखे भेट हात दुर्मिळ योग असल्याचे मानले जाते. बाळासाहेब विखे व यशवंतराव गडाख यांच्यामधील नगर लोकसभा निवडणूक निकालाच्या वादातून १९९१ मधील राजकीय खटला गाजला. हा खटलाच त्यांच्यातील राजकीय वैमनश्याचे कारण ठरला होता.

सभापती राम शिंदे यांनी जाहीर करून गडाख यांची भेट घेतली होती. मात्र विखे पिता-पुत्रांनी अचानकपणे भेट घेतली. मंत्री विखे शुक्रवारी रात्री नगरमध्ये मुक्कामी होते. त्यांनी यशवंत कॉलनी मधील गडाख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्या समवेत स्नेहभोजनही घेतले. यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख त्यांचे चिरंजीव उदयन गडाख उपस्थित होते. युवा नेते उदयन गडाख यांनी त्यांच्या समाज माध्यमावर या भेटीचे छायाचित्र झळकवल्यानंतर त्याचा गाजावाजा झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles