अहिल्यानगर: शहरातील मुकुंदनगर भागात घडलेली निघृण खुनाची घटना, त्यानंतर शहरात दोन दिवस निर्माण झालेली तणावाची परिस्थिती व सध्या सुरू असलेला पोलिसांची कारवाई यावरून सत्ताधारी महायुतीच्या पक्षांतील मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी तपासावर संशय घेत पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहेत अशा शब्दात समर्थन करताना आमदार जगताप यांच्याशी चर्चा करू असे सांगितले.
दरम्यान खुनाच्या घटनेत आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दहा दिवसांपूर्वी मुकुंदनगर भागात धीरज परदेशी या तरुणाचा निघृण खून करण्यात आला. त्यानंतर शहरात दोन दिवस बंद पाळण्यात आला, रास्तारोको आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या कर्मचारी संघटनेनेही बंद पाळला. शहरातील सुविधांवर त्याचा परिणाम झाला होता.
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पोलीस तपासावर संशय व्यक्त केला. मुख्य आरोपी फरार आहेत, पोलीस त्यांना पाठीशी घालत आहेत. स्वतंत्र तपासी अधिकारी नियुक्त करा, नगरमधील पोलीस अधिकाऱ्यांवर विश्वास राहिला नाही, पोलीस अधिकारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.असे असले तरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले, पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहेत. यामध्ये शंका घेण्याचे कारण नाही. खुनाची घटना दुर्दैवी आहे. बहुतांशी आरोपी अटक झाले आहेत. पोलिसांची कारवाई सुरू आहे. सरकारी यंत्रणेला त्यांचे काम करू दिली पाहिजे.
आमदारांनी व्यक्त केलेला संशय, आरोप आपण ऐकले आहेत. त्यांनी कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केले, याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ. आपण त्यांच्याशी चर्चा करू. परंतु पोलिसांचे मनोबल वाढवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे, असे विखे यांनी स्पष्ट केले.रास्तारोको आंदोलनात काही जणांनी पाकिस्तानशी संबंध जोडला, याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री विखे म्हणाले कोणत्या देशविघटीत शक्तींचा दुरान्वये जरी संबंध असेल तरी त्याची चौकशी होणारच. आवश्यकता भासल्यास आपण पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून सरकारला ‘एसआयटी’साठी शिफारस करू. मात्र मुकुंदनगर, श्रीरामपूर येथील घटनांकडे पोलिसांचे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तेथे कारवाई केली आहे.


