राहाता तालुक्यातील केलवड येथील मयत अक्षय रजपूत यांच्या कुटुंबीयांची डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतली भेट

न्याय देणार, मला आठ दिवस द्या : डॉ. सुजय विखे पाटील

केलवड येथील मयत अक्षय रजपूत यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट; कर्नाटकातील घटनास्थळी तपासासाठी पोलिस पथक पाठविण्याच्या सूचना

राहाता : केलवड येथील अक्षय दशरथ रजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाची जबाबदारी आपण घेतली असून, या प्रकरणात कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी मला आठ दिवसांचा वेळ द्या, असे आश्वासन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मयत अक्षय रजपूत यांच्या कुटुंबीयांना दिले.

तालुक्यातील केलवड गावातील अक्षय दशरथ रजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

अक्षय यांच्या मृत्यूशी संबंधित कर्नाटकातील घटनास्थळाची ऑनलाइन माध्यमातून माहिती घेण्यास डॉ. विखे पाटील यांनी सुरुवात केली. संबंधित ठिकाणचे खासदार, पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक प्रशासनाची माहिती घेऊन तेथील मंत्र्यांशीही लवकरच संपर्क साधण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. विखे पाटील यांनी राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्याशी संपर्क साधून कर्नाटक येथे तपासासाठी दोन पोलीस कॉन्स्टेबल पाठविण्याच्या सूचना दिल्या. तसेच अनुभवी पोलीस कर्मचारी आणि गावातील काही जबाबदार व्यक्तींना कर्नाटकातील घटनास्थळी पाठवून प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण माहिती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानुसार सोमवारी राहाता पोलिसांचे पथक तसेच कुटुंबातील काही जबाबदार व्यक्ती कर्नाटक येथे जाणार आहेत.

आपली टीम घटनास्थळी जाऊन संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेईल. या मृत्यू प्रकरणात नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच पुढील कार्यवाही केली जाईल. कोणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे कुटुंबीयांनी कोणतीही काळजी करू नये, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

घटनास्थळी भाजप युवा मोर्चाचा किंवा पक्षाशी संबंधित कोणता कार्यकर्ता आहे का, याचीही आपण माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण सर्वांच्या समन्वयातून आणि कायदेशीर मार्गाने हाताळले जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहनही त्यांनी कुटुंबीयांना केले.

दरम्यान, गावातील ग्रामस्थांनी ग्रामसेवकांशी चर्चा करून संबंधित कागदपत्रांची तसेच सातबारा उताऱ्याची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही डॉ. विखे पाटील यांनी केली. आपण दिलेला शब्द पूर्ण करतो, असे सांगत मयत अक्षय रजपूत यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठीही आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles