हिंदी आणि मराठी भाषेच्या वादाची ठिणगी आता प्रचंड पेट घेताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचंल. तसेच ओपन चॅलेंज दिलं होतं. ‘आपआपल्या घरात प्रत्येक व्यक्ती सिंह असतो. तुमच्यात जर हिंमत असेल, तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यात या. तुम्हाला दाखवून देऊ. महाराष्ट्रबाहेर या.. तुम्हाला आपटून आपटून मारू..’, असं निशिकांत दुबे म्हणाले. यावर कालच्या मीरा रोडमधील सभेत राज ठाकरेंनी दुबेंवर तोफ डागली. त्यांच्या टिकेला दुबेंनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत पोस्ट केली आहे.
मनसैनिक आणि मराठी माणसाने मीरा भाईंदरमध्ये धडक मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान, त्यांनी परिसर दणाणुन सोडला. या मोर्चानंतर थेट काल राज ठाकरेंनी जाहीर सभा घेत उपस्थितांना संबोधित केलं. तसेच दुबेंनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं. ‘दुबे नावाचा कुणीतरी व्यक्ती.. भाजपचा खासदार. मराठी जनतेला पटकून पटकून मारू.. असं म्हणाला. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेलवाल्यांनी चालवलंय काय? त्याच्या वक्तव्यावर बातमी झाली? त्याचं वक्तव्य दाखवलं का? बघा हे कसे असतात.. तू आम्हाला पटक पटकके मारणार का? दुबेला मी सांगतो. तूम मुंबई आओ.. हम तुम्हे मुंबई ते समंदर में डुबे डुबे मारेंगे..’ असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप खासदार दुबेंना प्रत्युत्तर देत आव्हान दिलं.
राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर निशिकांत दुबे यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. दुबेंनी राज ठाकरेंचा व्हिडिओ शेअर केला. तसेच त्यावर कॅप्शन दिलं आहे. ‘मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? (मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी?)’, असं म्हणत त्यांनी एएनआयचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


