महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियमा अंतर्गत नोंदणी करावी : डॉ.उमेश पाटील
महाराष्ट्रात गो जातीय प्रजनन अधिनियम कायदा लागू
नगर : भारत देश दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असला तरी प्रगत देशाच्या तुलनेत प्रति जनावर दुग्ध उत्पादन खूपच कमी आहे.त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशु पालकांना उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा, भ्रूण उपलब्ध होणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अन्वये 5 डिसेंबर 2024 पासून त्यासाठीचे नियमन महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहे. सदर अधिनियमनाच्या अंमलबजावणीसाठी गोजातीय प्रजनन कामांमध्ये सहभागी प्रत्येक घटक जसे कि रेत केंद्र,भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था, सहयोगी जनन तंत्रज्ञ सेवा पुरवठादार, सहयोगी जनन तंत्रज्ञ संस्था,रेत बँक, कृत्रिम रेतन सेवा पुरवठाकार, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ अशा सर्वांनी तात्काळ आवश्यक त्या नोंदणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज करून नोंदणी करावी असे आवाहन अहिल्यानगरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.उमेश पाटील यांनी केले आहे.
या अधियमनातंर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे येथे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या स्तरावर होणाऱ्या दैनंदिन कामकाजासाठी जिल्हा मुख्यालयात जिल्हा कृत्रिम रेतन केद्र याठिकाणी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन हे पद नव्याने निर्माण करण्यात आले आहे. अहिल्यानगर मध्ये डॉ.अरूण् हरिश्चंद्रे नुकतेच या पदावर रूजू झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.उमेश पाटील यांनी दिली. यावेळी सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.मुकुंद राजळे, डॉ. संतोष पालवे उपस्थित होते.
उच्च दुध उत्पादनासाठी जनुकीय दृष्ट्या सुधारित गोवंश निर्माण करणे, वीर्य व भ्रूण उत्पादन करण्यासाठी रोगमुक्त, गुणवत्ता पूर्ण वळूंचा वापर सुनिश्चित करणे, वीर्य व भ्रूण उत्पादन, विक्रीकर नियंत्रण, कृत्रिम रेतन प्रक्रियेचे शास्त्रीय नियमन,व प्रजनन कार्य करणाऱ्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे असे विविध उद्देश या नियमनाचे आहेत.
नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्ती, संस्था यांनी नियमनातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास त्यांना दंड आकारण्यात येईल. रेत केंद्र,भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था, सहयोगी जनन तंत्रज्ञ सेवा पुरवठादार, सहयोगी जनन तंत्रज्ञ संस्था यांना पुणे येथील आयुक्तलयातील प्राधिकारणामध्ये नोंदणी करावी लागणार आहे.
तसचे रेत बँक, कृत्रिम रेतन सेवा पुरवठाकार, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ संबधित यांना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे कडे विहित शुल्क भरून नोंदणी करावयाची आहे.
सर्वसामान्य पशुपालकांच्या हिताचा हा निर्णय असल्याने सर्व संबंधीत घटकांनी या अधिनियमच्या अंमल बजावणीसाठी सहकार्य करावे–
डॉ उमेश पाटील,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,अहिल्यानगर
नोंदणी संदर्भात काही अडचणी असतील अथवा काही शंका असतील तर जरूर संपर्क करावा-
डॉ हरिश्चंद्रे,सहाय्यक आयुक्त,जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र,अहिल्यानगर


