अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु झाल्या. अनेक दिवस दोन्ही पक्षातून याबाबत विविध वक्तव्य समोर आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाची चर्चा सुरु नसल्याचे दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सांगितले जात आहे. अशात आता शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य केले आहे. रोहित पवारांनी विलिनीकरण केव्हा शक्य होईल? यावर मत मांडले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शेतकरी कर्जमाफी, महागाई, स्मार्ट मीटर या विविध प्रश्नांच्या विरोधात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात सहभागी होण्यासाठी रोहित पवार आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवारांना यावेळी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट करताना, एक शक्यताही बोलून दाखवली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर, “प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी एकत्र येऊन पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. याचे पुरावे मी दिले आहेतच”, असे रोहित पवारांनी सांगितले. “हा विषय पुन्हा चर्चेत आणण्याचा काही फायदा होईल असे मला वाटत नाही. आमचा पक्ष आणि त्यांचा पक्ष तेव्हाच एकत्र येऊ शकतो, जर त्यांनी भाजपाची साथ सोडण्याचा विचार केला तरच”, असे रोहित पवारांनी विलिनीकरणाची चर्चा सुरु नसल्याचे स्पष्ट करत यावर किती दिवस चर्चा करणार? असाही प्रश्न उपस्थित केला. “विलिनीकरणाची चर्चा कुठेही सुरु नाही. अर्थखातं त्यांना मिळावं यासाठी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांबरोबर बैठका झाल्या, अमित शाहांबरोबर बैठका झाल्या. अजित पवारांनी हक्काने अर्थखातं त्यांच्याकडे ठेवलं होतं ते खातं अजूनपण भाजपा त्यांना देत नाही. त्यामुळे त्यांच्याच मित्रपक्षासमोर त्यांचं चालत नाही. अशा परिस्थितीत लोकांची भूमिका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे, आम्ही खूश आहोत, लोकांबरोबर राहून या सरकारच्या विरोधात बोलायला”, असेही रोहित पवार म्हणाले.रोहित पवार गोंदियात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.


