देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ने बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेदारांसाठी कॅश विड्रॉलशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. हे नवे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे BSBD खाते असलेल्या ग्राहकांनी या बदलाची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.SBI च्या नव्या नियमांनुसार, महिन्यातील पहिल्या चार कॅश विड्रॉलनंतर होणाऱ्या प्रत्येक रोख व्यवहारासाठी १५ रुपये अधिक GST शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी पहिल्या चार मोफत व्यवहारांची गणना करताना डिजिटल व्यवहारांचा समावेश केला जात नव्हता. मात्र, आता ही सूट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी महिन्यात केलेल्या व्यवहारांची संख्या लक्षात ठेवणे गरजेचे ठरणार आहे.
BSBD खाते प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते. या खात्यासोबत चेकबुकची सुविधा उपलब्ध नसते. मात्र, पैसे काढण्यासाठी ग्राहक ब्रांचमध्ये विड्रॉल फॉर्मचा वापर करू शकतात. याशिवाय ATM द्वारेही पैसे काढता येतात. खातेदाराला बेसिक RuPay ATM-कम-डेबिट कार्ड दिले जाते.BSBD खाते उघडणाऱ्या ग्राहकाकडे दुसरे सेव्हिंग्स बँक खाते असता कामा नये. एखाद्या ग्राहकाकडे आधीपासून सेव्हिंग्स खाते असल्यास, BSBD खाते उघडल्यानंतर ३० दिवसांच्या आत जुने सेव्हिंग्स खाते बंद करावे लागते.


