अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या तरुणांच्या कुटुंबियांकडून पैसे घेवून लग्न जुळवणार्या आणि नंतर बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. लग्न करून आणलेली नवरी रात्रीतून गायब होत असल्याने पैसेही गेले आणि बायकोही नाही अशी अवस्था तरुणांची होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे सुरू असलेली फसवणुकीची मालिका चिंतेचा विषय बनली आहे. जिल्ह्यात १९ डिसेंबर रोजी अशाच प्रकारच्या फसवणुकीचा गुन्हा कर्जत पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
सध्या लग्नाळू मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची मोठी भयाण परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुलांची लग्न होत नसल्याने अनेक पालक चिंतेत असतात. या परिस्थितीचा फायदा घेत काही दलाल आता बाहेरून शिकलेल्या किंवा गरीबाच्या मुली आणतो, तुमच्या मुलाचे लग्न लावून देतो असे आश्वासन देत त्या कुटुंबांना आर्थिक व मानसिक फसवणुकीच्या जाळ्यात ओढत आहेत. हे दलाल अगोदर गरजू कुटुंबांना हेरतात सुरुवातीला मुलगी पाहण्यासाठी घेवून जातात. त्यानंतर बनावट पत्त्यावर, भाड्याच्या घरात राहणार्या मुली दाखवून पालकांची दिशाभूल केली जाते. या मुलींची ओळख पटवण्यासाठी बनावट आधारकार्ड वापरले जात असल्याचेही उघड झाले आहे.
बोलणी ठरल्यावर मुलाकडून मुलीच्या घरच्यांना ३ ते ५ लाख रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली जाते. लग्नाआधी अर्धी रक्कम आणि लग्नाच्या दिवशी उरलेली रक्कम दिली जाते, एखाद्या मंदिरात लग्न लावले जाते. नवरी मुलगी मुलाच्या घरी येते आणि रात्रीच ती घरातील दागदागिने घेऊन पसार होते. बहुतेक प्रकरणात पूर्वनियोजित गाडी घराबाहेर तयार असते. रात्री बारा ते एकच्या दरम्यान मुलगी आणि तिच्यासोबत आलेली महिला घर सोडून पळतात. सकाळी उठल्यानंतर नवरी गायब झाल्याचे लक्षात येते. घरच्यांनी दलालाशी संपर्क साधल्यावर तो मात्र हात झटकतो. माझं काम लग्न लावून देण्यापर्यंतच होतं अशी प्रतिक्रिया देतो. या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उध्वस्त झाली आहेत.
पळून जाणाऱ्या नवरीला पकडले
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील फिर्यादी हे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहत होते. त्यांचा अनिल राठोड (रा. उदगीर, जि. लातूर) व संगीता लवटे (रा. लातूर) यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी त्यांना मुलगी पाहण्यासाठी निलंगा (लातूर) येथे बोलावले. तेथे ऐश्वर्या प्रमोद जाधव नावाची मुलगी त्यांना दाखवली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना देण्यासाठी २ लाख रुपये रोख व १ लाख ३० हजार रुपये फोन पे द्वारे फिर्यादी यांच्या कडून घेतले. १८ डिसेंबर रोजी तेथेच एका मंदिरात दोघांचे लग्न लावले.
नवरी मुलीला घेवून फिर्यादी व कुटुंबीय त्यांच्या गावी आले. येथे पोहचेपर्यंत मुलीच्या दुसऱ्या नातेवाईकांनी तिची मिसिंगची तसेच अपहरणाची तक्रार लातूर पोलिस ठाण्यात दिली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास नवरी मुलगी बाथरूम ला जावून येथे म्हणून घरातून बाहेर पडली. ती पळून जात असताना फिर्यादी व कुटुंबीयांनी तिला पकडले. काही वेळाने मुलीचे दुसरे नातेवाईक तेथे आले व तुम्ही आमच्या मुलीचे अपहरण केले असल्याचे सांगत धमकावू लागले.
हा प्रकार पाहून आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी सायंकाळी कर्जत पोलिस स्टेशन गाठून पो. नि. सोपान शिरसाठ यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांची फिर्याद घेण्यात आली व त्यानुसार लग्न जमविणारे दोघे व नवरी अशा तिघांच्या विरुद्ध पोलिसांनी बीएनएस कलम ३१८ (४), ८३, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मुलाचे लग्न उशिरा झाले तरी चालेल, पण फसव्या लग्नमांडवात मुलाचे आयुष्य अडकू नये. पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगणे ही काळाची गरज आहे. मुलाचे लग्न व्हावे म्हणून काहीही करा या मानसिकतेचा फायदा हे फसवे दलाल घेत आहेत. त्यामुळे पालकांनी आता तरी जागे व्हावे, आपल्या मुलांना व्यवसायात किंवा आत्मनिर्भरतेकडे वळवावे, आणि अशा फसव्या दलालांपासून सावध राहावे.


