Tuesday, November 11, 2025

मागेल त्याला सौर पंप ! अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9 लाख सौरपंप मंजूर करण्यात आले आहेत. आपण ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना काय आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि लाभार्थी निवड कशी होणार, याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मागेल त्याला सौर पंप योजना काय आहे?

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, या हेतूने राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार 3,5,7.5 अश्वशक्ती (HP) क्षमतेचे पंप दिले जाणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किंमतीच्या 10% रक्कम, तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किंमतीच्या 5 % रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे.

पैशांच्या स्वरुपात पाहिल्यास साधारणपणे शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम पुढीलप्रमाणे असणार आहे.

3 HP क्षमतेचा पंप – 17,500 ते 18,000 रुपये

5 HP क्षमतेचा पंप – 22,500 रुपये

7 HP क्षमतेचा पंप – 27,000 रुपये

सौर कृषी पंपाची देखभाल व दुरूस्तीचा कालावधी 5 वर्ष राहणार आहे. या कालावधीत सौर कृषी पंप नादुरूस्त झाल्यास विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी अर्ज करताना शेतकरी जी एजन्सी निवडणार आहे, त्या एजन्सीची राहणार आहे. तसेच, वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत सौर पॅनेलचे नुकसान झाल्यास, त्याची चोरी किंवा तोडफोड झाली तर एजन्सीकडून विम्याचे संरक्षणही मिळणार आहे.

लाभार्थी निवड कशी होणार?

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत (विहिर, शेततळे, बोअरवेल इ.) उपलब्ध आहे आणि ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरता वीज पुरवठा देण्यात आला नाही असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार पंप दिले जाणार आहेत. त्यात, 2.5 एकरपर्यंत शेतजमीन असेल तर 3 HP क्षमतेचा पंप दिला जाईल. 2.5 ते 5 एकरपर्यंत शेतजमीन असेल तर 5 HP क्षमतेचा पंप दिला जाईल. 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर 7.5 HP क्षमतेचा पंप देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार सौर पंप दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार सौर पंप दिला जाणार आहे. याशिवाय, वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे, विहिर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील. तसेच अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज कुठे व कसा करायचा?

मागेल त्याला सौर पंप योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कधीही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज जवळच्या महावितरणच्या कार्यालयात जाऊन करता येतो. ऑनलाईन अर्ज महावितरणची अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in वर शेतकरी स्वत: करू शकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles