सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. बारामती पोटनिवडणुकीसाठीची सांगता सभा मंगळवारी शारदा प्रांगणात पार पडली. या सभेसाठी राष्ट्रवादीसह महायुतीमधील मंत्री, नेते उपस्थित होते. यावेळी खासदार सुळे यांनी बारामतीकरांना सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले. सुळे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने सुनेत्रा पवारांना पाठिंबाही यावेळी जाहीर केला.
बारामतीकरांसाठी ऐतिहासिक वेळ – सुळे
“अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ-जय यांच्यावर मोठी जबाबदारी पडली. मोठ्या हिंमतीने ते तिघेही ही जबाबदारी पार पाडत आहेत”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा जाहीर करताना बारामती मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि मतदार सुनेत्रा पवार यांना मतदान करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेली सहा दशकं बारामतीकरांनी शरद पवारांना साथ दिली. सर्वात जास्तवेळा निवडूण येण्याचा ऐतिहासिक मान बारामतीकरांना मिळणार असल्याचा उल्लेख देखील सुळे यांनी भाषणात केला.
शरद पवार यांनी ६० वर्षे बारामतीसाठी काम केल्यानंतर अजितदादांनी ३५ वर्षे बारामतीकरांची सेवा केली. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा होती, घोषणा झाली त्याच दिवशी मी निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. काही जणांचे अर्ज अद्याप आहेत हे दुर्दैव आहे. पण, यावेळी विक्रमी मतदान होईल, याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. “अजितदादा आणि वहिनींना साथ द्या”, असे भावनिक आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.
सुनेत्रा पवारांच्या सभेत सुप्रिया सुळे भावूक; आठवला अजित पवारांचा अपघात
- Advertisement -


