राज्यातील दोन मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकांपैकी बारामती विधानसभा मतदारसंघात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीची जाहीर सांगता सभा संपन्न झाली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे मागणी केली.बारामतीच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार यांनी सहकारी पक्षासह साऱ्यांचे आभार मानले. तसेच अजित पवारांविषयी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्याचवेळी त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका असल्याचं म्हटलंय. अपघाताबाबत आपल्याही मनात शंका असल्याचं त्या म्हणाल्या. दादाचे दुर्दैवी निधन झाले आहे. अपघातात अनेक शंका आहेत, जसं तुमच्या मनात आहेत तशा माझ्या मनात आहेत. त्या शंकाचे निरसन झाले पाहिजे.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली असून त्याबाबत चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी आणि शाह यांनी सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यातील सत्य समोर आले पाहिजे. यातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री यांनीही यात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यात तडजोड करणार नाही. केंद्र आणि राज्य मदत करत आहे,यात काळजी नसावी, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. अजित पवार यांचे भव्य स्मारक आणि म्युझियम काही दिवसात निर्माण केले जाणार आहे. अजित पवार यांच्या आयुष्याचा संपूर्ण जीवनपट यात दाखवला जाणार आहे. लोकनेता म्हणून त्याच कार्य अफाट आहे. अजितदादा म्हणायचे मी कामाचा माणूस, मी कामाचाच माणूस असे म्हणायचे, तसेच मी बारामतीकरांसाठी अहोरात्र काम करीन. बारामती माझे कुटुंब आहे ही भावना बाळगून मी काम करत राहणार आहे.
अजितदादाच्या काळात सुरू झालेल्या पाणी योजना या पूर्ण होतील,अनेक एकर जमीन पाण्याखाली येतील,अनेक शाळा, आरोग्य केंद्र,कॅन्सर रुग्णालय दादाचे स्वप्न,असे अनेक विकास कामे अजितदादानी केले आहेत. विकासाचा वृक्ष आता वाढला आहे, बारामती नागरिक सुखी राहील. दादाजी बारामतीला प्रतिष्ठा राज्यात मिळवून दिला तो टिकवायचा आहे, वाढवायचा आहे. तुम्ही माणसे माझी आहात, तुमचा विकास करेन. दादाप्रमाणे माझ्यावर विश्वास ठेवा. बारामतीकरांनो माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही असं सुनेत्रा पवार आपल्या भाषणात म्हणाले.


