स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. मराठीच्या मुद्दा तापवून मुंबई, ठाणे महापालिकेसह इतर पालिकेच्या निवडणुकीची गोळाबेरीज सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मिनी मंत्रालयाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारू सुद्धा उधळणार आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात विविध निवडणुकांचे धुमशान पाहायला मिळले.राज्य निवडणूक आयोगाने
त्यासाठी पावलं टाकली आहेत. आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीसाठीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. 10 जुलै रोजी ही बैठक होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी त्याला उपस्थित असतील. गुरुवारी दुपारी 12 वाजता ही बैठक होईल. त्याविषयीचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी बैठकीबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पाठवले आहे.
येत्या काही काळात राज्यातील 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती आणि 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होतील. त्याची प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा 10 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. पण या बैठकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आढावा नसेल. राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतील. त्याविषयीचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात निवडणुकांचा धडाका सुरू होईल, असे चित्र आहे.


