राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा ; ठाकरेंचे ६ खासदार फुटणार असल्याचा दावा, हिंगोलीतील खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरेंचे ६ खासदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. ६ खासदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ईशान्य मुंबईतील ठाकरेंचे खासदार संजय पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच कारमधून प्रवास केला होता. आता हिंगोलीतील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नागेश पाटील आष्टीकर गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज सोमवारी नागेश पाटील आष्टीकर यांनी तब्बल पाऊण तास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीवर नागेश पाटील आष्टीकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मतदारसंघातील काही कामांची पत्र द्यायची होती. त्यामुळे ही भेट घेतल्याची माहिती नागेश पाटील आष्टीकर यांनी साम टीव्हीला दिली. मात्र ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या भेटी मागे काही राजकीय कारण आहे का याची चर्चा रंगली आहे.

तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी ठाकरेंचे ८ खासदार फुटणार असल्याचा दावा करण्यात येत होता. यासाठी ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याचाही दावाही करण्यात आला होता. परंतु ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आता पुन्हा ऑपरेशनची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आष्टीकरांचं मोठं वक्तव्य
आम्ही विरोधी पक्षातले खासदार आहोत, त्यामुळे ते आम्हाला लगेच बोलवतील अशातला काही भाग नाही. त्यामुळे त्यांनी जेव्हा मला बोलावलं तेव्हा मी गेलो आणि ते पत्र दिलं. ही भेट विकास कामासंदर्भात होती, ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही, आणि जर असेल तर निदान आम्हाला तरी सांगा म्हणजे आम्ही आमची भूमिका मांडू, मला जर जायचं असेल तर मी सांगून जाईन. या नुसत्या चर्चा आहेत, या चर्चा घडवून आणल्या जात आहेत, यामध्ये कुठलंही तथ्य नाही. आमचे नेते एकच उद्धव ठाकरे आहेत,’ असंही यावेळी आष्टीकर यांनी म्हटलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles