डान्स ही शिकून आत्मसात करण्याची कला असली, तरी त्याची मुळात आवड असावी लागते, त्यांचा आनंद घेता आला पाहिजे. डान्स करणाऱ्याला ही आवड जपण्यामुळे आणखीही बरेच उपयोग होतात. ते स्वतःहून फिट राहण्याचा प्रयत्न करतात आणि वेगवेगळे डान्स प्रकार इतरांना सुद्धा व्हिडीओत दाखवताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये १६ वर्षाच्या मुलीने कमरेवर तलवार ठेवून कमाल केली आहे.
छत्तीसगडमधील १६ वर्षीय मुलीने कतरिना कैफच्या कबीर खान दिग्दर्शित ‘फँटम’ या सिनेमातील ‘अफगान जलेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. पण, या गाण्यात थोडा ट्विस्ट देण्यासाठी तिने तलवारची मदत घेतली आहे. सुरवातीला ती कमरेवर, डोक्यावर, हातावर तलवार ठेवून बेली-डान्स करण्याचा प्रयत्न करते. पण, तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरतो. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर तिचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो आणि ती तलवार कमरेवर ठेवून बेली-डान्स करताना दिसते आहे.
१६ वर्षाची लावण्या फक्त नाचत नव्हती. तर ती तलवार शरीरावर संतुलित ठेवून सादरीकरण करत होती. यादरम्यान तिने एकही ठोका चुकवला नाही. गाण्याच्या प्रत्येक ओळीवर तिच्या स्टेप्स, तिचे हावभाव, तिच्या अदा अगदी बघण्यासारख्या होत्या. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lavanya.das_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “शेवटपर्यंत पाहा” ; अशी कॅप्शन पोस्टला देण्यात आली आहे. बेली-डान्सच्या या व्हिडीओला ७४ दशलक्ष (७४ मिलियन) व्ह्यूज मिळाले आहेत आणि कमेंट्समध्ये लोक मोठ्या प्रमाणात तिचं कौतुक करत आहेत.


