अहिल्यानगर – तालुक्यात चोरी, घरफोडी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून सोमवारी ( दि. १३ ) मध्यरात्रीनंतर बाबुर्डी घुमट येथे चोरट्यांच्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून या तरूणाचे प्राण वाचले. योगेश भास्कर चव्हाण, रा. बाबुर्डी घुमट, ता. अहिल्यानगर असे गंभीर जखमी तरूणाचे नाव आहे. या घटनेत चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल चोरून नेला.
याबाबत हकीकत अशी की, बाबुर्डी घुमट येथील चव्हाण वस्तीवर सोमवारी मध्यारात्रीच्या सुमारास चौघा अनोळखी चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. यातील दोन चोरटे घराच्या भिंतीच्या आडोशाला लपून बसले तर दोघा चोरट्यांनी योगेश चव्हाण यांच्या एका खोलीचा दरवाज तोडून घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्या आई आणि तीच्या नातीला धमकी, दमबाजी करत अंगावरचे दागिने मागितले. चोरट्यांची चाहूल लागताच योगेश याने शेजारी राहणारे चूलते रावसाहेब विश्वनाथ चव्हाण यांना फोन करून बोलावले. ते आल्यानंतर त्यांची चोरट्यांशी झटापट झाली. यावेळी योगेश चव्हाण यानेही चोरट्यांना प्रतिकार केला. याचवेळी लपून बसलेल्या चोरट्यांनी कत्तीसाख्या लोखंडी हत्याराने योगेशच्या डोक्यावर जबर घाव घातला. या मारहाणीत योगेश गंभीर जखमी झाला. त्यानंतर चोरटे तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या योगेशला तातडीने नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत फिर्यादी रावसाहेब चव्हाण यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादी व त्यांचा पूतण्या यांना कत्तीसारख्या लोखंडी हत्याराने जबर मारहाण करत चोरट्यांनी फिर्यादीची नात हीचा १० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरून नेला असल्याचे म्हटले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलिस करत आहेत.


