जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची रविवारी 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
नगर : अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी एक वाजता पटेल मंगल कार्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर सभासदांना लाभांश व ठेवीवरील व्याजापोटीचे एक कोटी पन्नास लाख रुपये सभासदांच्या बँक खात्यात ऑनलाईन वर्ग करण्यात येणार आहेत. अशी माहिती संस्थेचे चेअरमन सतिश मोटे यांनी दिली असून त्यांच्या कार्यकाळात पतसंस्थेच्या ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे
एकच ध्यास सभासदांचा सर्वांगीण विकास या उक्ती नुसार सभासदांच्या ठेवीवर 10 टक्के व्याज व लाभांश स्वरूपात 15 टक्के व्याज देण्याचे धोरण चेअरमन सतिश मोटे, व्हा.चेअरमन दिलीप नागरगोजे, मानद सचिव शाम भोसले व सर्व सन्माननीय संचालक मंडळाने कायम ठेवले आहे. सर्व सभासद ग्रामपंचायत अधिकारी बांधवांच्या राष्ट्रीयकृत बँकेमधील खात्यावर लाभांशाची रक्कम ऑनलाईन वर्ग करण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था ग्रामपंचायत अधिकारी बांधवांसाठी अनेक कल्याणकारी उपक्रम राबवित असते. 24 तासाच्या आत 30 लाख साधारण कर्ज व तातडीचे कर्ज 1 लाख रुपये देणारी अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातील एकमेव पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था आहे. तसेच 7 टक्के व्याज दराने 5 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 55 वर्षापासून संस्थेला ऑडिट अ वर्ग आहे. मयत सभासदांसाठी संपूर्ण कर्जमाफी योजना राबविली जाते. सभासदांना 25 लाखांचे अपघाती विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. संस्थेची स्वमालकीची तीन मजली भव्य इमारत नगर शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. ग्रामपंचायत अधिकारी मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित आहे.
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील म्हणाले, सर्वोत्कृष्ट कारभारासाठी पतसंस्था राज्यात आदर्शवत मानली जाते. संस्थेचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी हे सर्वांना विश्वासात घेवून कामकाज करतात.सभासद व ठेवी वाढीसाठी त्यांची नक्कीच मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
आर्थिक वर्षात 57 कोटीची उलाढाल संस्थेमार्फत झालेली आहे. सभासद आणि बिगर सभासदांच्या ठेवी स्वीकारल्या जातात. त्यावर सुद्धा दहा टक्के व्याज दिले जात आहे. जेष्ठ नागरिक व विधवा भगिनींना मुदत ठेवीवर साडेदहा टक्के दराने व्याज दिले जाते.आज संस्थेकडे 37 कोटी ठेवी जमा झालेल्या आहेत. सर्व व्यवहार ऑनलाइन संगणकीकृत आहे. अशी माहिती चेअरमन सतिश मोटे व सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर यांनी दिली.
वार्षिक सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव, सेवानिवृत्त बांधवांचा सपत्नीक सन्मान करून गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन संघटनेच्या आमसभेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हितास्तव अनेक कल्याणकारी निर्णय घेतले जाणार आहेत. जिल्हास्तरावरील समस्यावर चर्चा होऊन धोरणात्मक ठराव पारित केले जाणार आहेत. या सभेस सर्व सन्माननीय सभासद, संघटना पदाधिकारी, व सन्माननीय संचालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मानद सचिव शामराव भोसले यांनी केले. यावेळी संस्थेचे चेअरमन सतिष मोटे, व्हा.चेअरमन दिलीप नागरगोजे, मानद सचिव शाम भोसले, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, पतसंस्थेचे संचालक सुनिल नागरे, मंगेश पुंड, वाळीबा मुंढे, रुबाब पटेल, किसन भिंगारदे, उद्धव जाधोर, भगवान खेडकर, भाऊसाहेब गायकवाड,रामदास गोरे, संदीप लगड, सुरेश मंडलिक, नारायण खेडकर, सुनिल वाघ, भाऊसाहेब गायकवाड, सविता भाकरे, राणी फाटके, लक्ष्मण नांगरे, मधुकर जाधव, सचिन गदादे, व्यवस्थापक प्रदीप कल्याणकर, वरिष्ठ सहायक नफीस खान पठाण आदी उपस्थित होते.


