माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेलने निर्विवाद विजय मिळवला. चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलचा दारुण पराभव झाला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील श्री. निलकंठेश्वर पॅनेलने एकहाती सत्ता मिळविली. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलचा धुव्वा उडाला. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल आणि शेतकरी कष्टकरी समितीच्या पॅनेलला तर सभासदांनी सपशेल नाकारले. बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या निकालानुसार पवार यांच्या पॅनेलला २० तर सहकार बचावला चंद्रराव तावरे यांच्या रुपाने अवघी एक जागा मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दादांनी सर्व ताकद लावली असली तरी मात्र चंद्रराव तावरे यांचा विजय काही रोखू शकले नाहीत.
आजच्या पराभवाने आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज नाही. खऱ्या अर्थाने नेतृत्वाने नैतिकतेच्या मार्गाने विजय कसा मिळवायचा, यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ जावे. त्यांनी सत्तेचा पुरेपुर गैरवापर केला. सर्व शासकीय यंत्रणाचा वापर करीत दबावतंत्राद्वारे माळेगांवच्या सभासदांना वेठीस धरण्याचे काम केले. माळेगांवला मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाले. त्यांनीच यासाठी आत्मचिंतन करावे. नेतृत्वाला माळेगावला कशासाठी ९ दिवस तळ ठोकुन थांबावं लागलं. चेअरमन पद मिळविण्यासाठी हे सर्व केल कार, दोन आमदार एक मंत्री कामाला लावून मिळविलेला विजय हा नैतिकतेला धरुन नसल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलचे नेते रंजनकुमार तावरे यांनी केला. त्यांनी ५ वर्ष सभासदांना सर्वाधिक भाव देवून दिलेला शब्द पाळावा,असे देखील आवाहन तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले.


