माननीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी रु. २३९.८० कोटी निधीच्या १६.५० कि.मी. पुणतांबा -साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली.
हा प्रकल्प क्षमता वाढीसाठी २०२४-२५ च्या मल्टी ट्रॅकिंगच्या छत्रप्रकल्प (Umbrella Work)चा एक भाग आहे. प्रकल्प क्षेत्राच्या जवळील परिसरात अहमदनगर, पुणतांबे, शिर्डी आणि नाशिक रोड मार्गे पुणे–नाशिक नवीन जोडणाऱ्या मार्गासाठी अंतिम सर्वेक्षणाची कामे सध्या प्रगतीपथावर सुरू आहेत. हा प्रस्तावित मार्ग एक नवीन रेल्वे वाहतूक मार्ग म्हणून कार्य करणार असून, दोन अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमधील रेल्वे संपर्क अधिक बळकट करणार आहे.
दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणतांबा- साईनगर शिर्डी मार्गावरील ताण कमी होईल सध्या या विभागाचा वापर केवळ १९.६६% इतका आहे. मात्र, नजीकच्या भविष्यात दुहेरीकरणाशिवाय वापर क्षमता ७९.७०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मार्गावर ताण वाढू शकतो.
पुणतांबा आणि साईनगर शिर्डी हे दोन्ही शहर आधीच रेल्वे मार्गाने जोडले गेले असून आणि या मार्गावर अनेक ट्रेन धावत आहेत. या प्रकल्पामुळे साईनगर शिर्डीला रेल्वेची जोडणी सुलभ होईल आणि शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हे सोयीस्कर ठरेल.
याचा फायदा केवळ भाविकांनाच नाही तर नियमित प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकरी यांनाही होईल. यामुळे शेतमालाची बाजारपेठेकडे वाहतूक अधिक सुलभ होणार असून परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.


