भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील उपस्थित होती. या कार्यक्रमात क्रिकेटपेक्षा जास्त काहीच आवडत नाही, असं मत स्मृती मानधनाने व्यक्त केलं.
आयुष्यात इतके चढ-उतार असूनही तु क्रिकेटवर कशी लक्ष केंद्रित करते, असा प्रश्न कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक, क्रिकेट समालोचक मंदिरा बेदी यांनी स्मृती मानधनााला विचारला. यावर मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते. भारतीय जर्सी घालणे ही आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे. तुम्ही तुमच्या सर्व समस्या बाजूला ठेवता आणि त्यामुळेच तुम्हाला जीवनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते, असं उत्तर स्मृती मानधनाने दिलं.2025 चा विश्वचषक आम्ही गेल्या काही वर्षांपासून सहन केलेल्या संघर्षांचे बक्षीस होता. मी 12 वर्षांहून अधिक काळ खेळत आहे. कधीकधी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. 2025 च्या विश्वचषकाने दोन महत्त्वाचे धडे दिले. प्रत्येक डाव शून्यापासून सुरू होतो, जरी तुम्ही मागील डावात शतक केले असले तरीही आणि कधीही स्वतःसाठी खेळू नका, हेच आम्ही एकमेकांना आठवण करून देत राहिलो. गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी, असं स्मृती मानधना पोस्ट करत म्हणाली. स्मृतीच्या या पोस्टनंतर पलाशनेही सोशल मीडियावर पोस्ट केली.


