अहिल्यानगर -शहरातील मल्हार चौक परिसरात किरकोळ वादातून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळासाहेब मल्हारी भंडारकर याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्हार चौक, स्टेशन रोड येथे ही घटना घडली. आरोपी बाळासाहेब भंडारकर याने फिर्यादी महिलेला विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रागाच्या भरात आरोपीने जवळ असलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने महिलेवर सपासप वार केले. घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोतवाली पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सावेडीत भरदिवसा बंगला फोडला; १५ लाखाचा ऐवज लंपास
शहरातील सावेडी उपनगरातील विराज कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याचे कुलूप तोडून मोठी चोरी केली आहे. व्यावसायिक अशोककुमार अग्रवाल यांचे कुटुंब जयपूर येथे नातेवाईकांकडे गेले असताना ही घटना घडली. चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचा कडा-कोंडा तोडून आत प्रवेश मिळवला. घरातील दोन्ही बेडरूममधील कपाटांचे लॉकर फोडून ७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. यामध्ये सोन्याच्या अंगठ्या, चैन, मंगळसूत्र, हातातील कडे, हिऱ्यांचे पेंडंट आणि चांदीच्या भांड्यांचा समावेश आहे. चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्कही पळवून नेली. घराची साफसफाई करणाऱ्या महिलेला दरवाजा उघडा दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास सुरू केला आहे. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी बाहेरगावी जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


