राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात बोलताना अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. “विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होते,” असे वक्तव्य करत अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता ‘घातपाता’चे नवे वळण दिले आहे.
मिटकरी यांनी अकोल्यातील सभेत बोलताना अपघाताच्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, “घटनेच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो होतो. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी मला एक हादरवून टाकणारी माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पाहिले होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले, पण ते जवळ पोहोचण्यापूर्वीच विमानाचा भीषण स्फोट झाला, असल्याचे मिटकरी यांनी सांगितले.
अजित पवारांच्या मृत्यूबाबत मिटकरींनी पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त केला आहे. आता अधिक आक्रमक होत त्यांनी स्पष्ट केले की, “हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत या मृत्यूचे गूढ उकलत नाही, तोपर्यंत मी जिवंत असेपर्यंत लढा देत राहीन. जर दादांच्या मृत्यूचा कट रचला गेला असेल, तर त्याचा बदला घेणे ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे.”


