अहिल्यानगर – नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा (म्हसोबावाडी) शिवारात सामाईक विहिरीतून पाणी भरण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादात आरोपींनी एका ५५ वर्षीय महिलेसह त्यांच्या पतीला लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत साखरबाई मोहन पिंपळे (वय ५५, रा. राळेगण म्हसोबा, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि तिचे पती आपल्या शेतातील सामाईक विहिरीवर पाणी भरण्यासाठी पाईप जोडत होते. त्यावेळी आरोपी लिलाबाई पिंपळे, राजाराम पिंपळे, महादेव पिंपळे, सुनिता पिंपळे आणि दिगंबर पिंपळे यांनी तेथे येत पाणी भरण्यास मज्जाव केला. विहीर सामाईक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी संतापून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपी राजाराम याने फिर्यादी महिलेच्या डोक्यात आणि हातावर काठीने प्रहार केला.
वाद सोडवण्यासाठी आलेले महिलेचे पती मोहन यांनाही आरोपींनी पकडून पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत पीडित महिलेचे ५ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले आहे. आरोपींनी पुन्हा विहिरीवर आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असून, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी माने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


