लोडशेडिंगविरोधात खा. लंके यांचे ठिय्या आंदोलन
सायंकाळची वीज कपात तात्काळ थांबवा, अन्यथा कार्यालय बंद करू
अहिल्यानगर : प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असलेल्या सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंतच्या वीज लोडशेडिंगविरोधात खासदार नीलेश लंके यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी व महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत त्यांनी सायंकाळच्या वेळेतील लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान खासदार लंके यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सायंकाळी होणारे लोडशेडिंग तात्काळ थांबवावे, अन्यथा महावितरणचे कार्यालय बंद करण्यास भाग पाडू.”
या आंदोलनावेळी नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, प्रा. सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, श्रीकांत जगदाळे, अमोल खाडे, एकनाथ गांगर्डे, भाऊसाहेब काळे, पोपट पुंड, उद्योजक अल्ताफ शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
खासदार लंके यांनी सांगितले की, “लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच महिलांच्या स्वयंपाकाच्या वेळेत वीज नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. ग्रामीण भागात बिबट्याच्या भीतीमुळे अंधारात राहणे धोकादायक ठरत आहे.”
या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यामध्ये समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारवर टीका करत खासदार लंके म्हणाले की, “लोडशेडिंग करून शेतकऱ्यांची मुले गुरांमागे पाठवायची का? त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे का?” दरम्यान, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले की, वीज चोरी हा गंभीर प्रश्न असून तो नियंत्रणात आल्यानंतर २४ तास वीज पुरवठा शक्य होईल. शक्य तितक्या प्रमाणात लोडशेडिंग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. यावेळी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार हेही उपस्थित होते.
माळीवाडा वेस पाडण्यास विरोध
अहिल्यानगर शहराची दिल्लीगेट व माळीवाडा वेस ही पारंपारिक ओळख असून जाणीवपूर्वक राजकारण करून माळीवाडा वेस पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खासदार लंके यांनी केला. काही समाजकंटक यामागे असल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला. शहरातील सामाजिक संघटनांसोबत आपण ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांची उभारणी करण्याची मागणीही त्यांनी केली.
मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी स्वतः पाहणी करून प्रशासनाला पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.


