भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे प्रचंड टीकेच्या धनी झालेल्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. त्यावेळी रुपाली चाकणकरांनी या मागण्यांना फारशी भीक घातली नव्हती. मात्र, अशोक खरात प्रकरणाने रुपाली चाकणकर यांना नाईलाजाने का होईना पण महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे लागले. त्यांनी हे पद वाचवण्यासाठी आणि राजीनामा टाळण्यासाठी शेवटपर्यंत धडपड केली, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. परंतु, अखेर रुपाली चाकणकर यांना हे पद सोडावे लागले. या सगळ्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. अशोक खरातकडून महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना राजीनामा आवश्यक होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते रविवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याविषयी विचारणा करण्यात आली. आपण रुपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. प्राथमिकदृष्ट्या त्यांच्याविरोधात काही पुरावे मिळाले होते का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असं नाही, शेवटी त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीशी त्यांचा जवळचा संबंध आहे किंवा त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानलं आहे. अशा परिस्थितीत या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही, हे त्यांनीही मान्य केलं आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आपल्या कथित शक्तींचा उपयोग करुन महिलांना भरीस पाडणे यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. पण कोणी अशोक खरात यांना फक्त भेटलंय म्हणून त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


