राहुरी विधानसभा पोटनिवडणुक प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे लक्ष ;राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोकाटे यांच्या प्रचारात सक्रिय

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होत असली तरी, निवडणुकीत उमेदवार नसलेले माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून खिल्ली उडवली गेली होती, तेच विखे आता तनपुरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळू लागले आहेत. उमेदवारी न करणाऱ्या तनपुरे यांनी आपली भूमिका पूरेशी स्पष्ट केली नसल्याने विखे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांसह आपण तनपुरे यांची पुन्हा भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करून भाजपला अनुकूल भूमिका घेतली असली तरी त्यांनी उघडपणे भाजपबरोबर जाणे टाळले आहे. तनपुरे यांनी आपण अद्याप महाविकास आघाडीमध्येच आहोत असे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. तनपुरे यांचे समर्थक असलेले प्रमुख पदाधिकारी हे ‘थांबा आणि पहा’च्या भूमिकेत आहेत. ते अद्याप कोणत्याच उमेदवाराच्या बाजूने सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळेच ते तनपुरे यांच्याकडून मिळणारे सूचनेच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते.
तनपुरे यांचा राहुरीसह पाथर्डी व नगर तालुक्यातही कार्यकर्त्यांचा संच आहे. राहुरी तालुक्यातील नगरपालिका, बाजार समिती, साखर कारखाना अशा प्रमुख संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. त्यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे व आजोबा डॉ. बाबुराव तनपुरे यांनी मतदारसंघावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले. त्यामुळे तनपुरे कुटुंबियांना मानणाऱ्यांची संख्या राहुरी मध्ये मोठी आहे. या सर्वच संस्थांमधील प्रमुख पदाधिकारी तनपुरे यांच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत. काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचारात सक्रिय होऊ लागले होते, मात्र त्यांना थांबण्याची सूचना मिळाल्याचे समजले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles