राज्यात रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन मंत्री सरनाईक यांनी जाहीर केला आहे. या मुद्द्यावरून वादंग निर्माण झाला आहे.
रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संपावेळी मराठी रिक्षाचालकांना कोणी अडवले तर आम्ही त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा देणाऱ्या अमित ठाकरे यांची ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते, मारुन काढू… अमित ठाकरे हवालदार झालेत का? त्यांचे बोलणे सुज्ञपणाचे नाही. तुम्ही हवालदार झाला आहात की आरटीओचे शिपाई झाला आहात? अमित ठाकरे यांना मारहाणीचा बॅच मिळालाय का, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गुणरत्न सदावर्ते यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या परिवहन खात्याच्या निर्णयावर टीका केली. रिक्षाचालकांना रिक्षावाला नाही, रिक्षावाले साहेब बोला. कोणी कुठे राहावं आणि कुठे पोट भरावं हे सांगणारे तुम्ही कोण? तुमच्या पोटाच्या भरतीसाठी ईडी यंत्रणा लागतात का? माहिती नाही. मात्र, कष्टकरी मेहनत करतात. प्रताप सरनाईक यांनी कोणतीही गोष्ट गृहीत धरु नये. शिवसेनेतील लोक सरनाईक यांच्या बाजूने नाहीत. संजय निरूपमही परिवहन खात्याच्या निर्णयाविरोधात बोलले आहेत. हिंदी, मराठीवरुन काही लोकं इतरांना त्रस देऊ इच्छितात. मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यावर मारहाणीची भाषा करणारे नेते किती जणांच्या घरी जातात? आम्ही कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे आहोत. त्यांच्यावर कोणीही हात उचलायचा नाही. अन्यथा कोणीही सुटणार नाही, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.


