एनएचएआयचे पीआययू शिर्डीत कार्यालय नको, अहिल्यानगरमध्येच ठेवा: खा. लंकेंची गडकरींकडे धाव

एनएचएआयचे पीआययू कार्यालय शिर्डीला हलवू नका: खा. नीलेश लंकेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पीआययू अहिल्यानगर कार्यालयाचे शिर्डी येथे स्थलांतर करण्याच्या निर्णयाविरोधात खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तीव्र आक्षेप नोंदवला असून हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर पत्र सादर केले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या प्रशासकीय, भौगोलिक आणि विकासात्मक गरजांचा विचार करण्याचे आवाहन यावेळी खा. लंके यांनी केले.

24 एप्रिलचा आदेश व्यवहार्य नाही
एनएचएआय मुख्यालय, नवी दिल्ली यांनी दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार पीआययू अहिल्यानगर कार्यालय शिर्डी येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय व्यवहार्य नसून त्यामुळे सुरू असलेल्या महामार्ग प्रकल्पांच्या कामकाजावर तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे खा. लंके यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

सुरू असलेल्या प्रकल्पांवर परिणाम
अहिल्यानगर जिल्ह्यात एनएचएआयमार्फत अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत. अहिल्यानगर ते सोलापूर सीमा चारपदरीकरण, अहिल्यानगर बायपास, शहर उड्डाणपूल यांसारख्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळाली. सध्या माळशेज घाट ते अहिल्यानगर बायपास तसेच खरवंडी कासार ते एनएच-211 जंक्शन या मार्गावरील एनएच-61 चे व्हाईट टॉपिंग आणि अहिल्यानगर ते सावळी विहीर विभागातील एनएच-160 चे काम सुरू असून या सर्व प्रकल्पांचे नियंत्रण पीआययू अहिल्यानगर कार्यालयाकडून प्रभावीपणे केले जात आहे.

तसेच मंजूर झालेल्या नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा जवळपास 50 टक्के भाग अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून जात असून या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या देखरेखीची जबाबदारीही पीआययू अहिल्यानगर कार्यालयाकडे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय तुटणार
अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असून जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग तसेच इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये येथेच कार्यरत आहेत. महामार्ग प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेसाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय राखावा लागतो. त्यामुळे पीआययू कार्यालय अहिल्यानगरमध्येच असणे अधिक सोयीचे आणि परिणामकारक ठरत असल्याचे खा. लंके यांनी म्हटले आहे.

कार्यालय शिर्डी येथे हलविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क आणि समन्वय साधण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील नागरिक, शेतकरी, जमीनमालक आणि महामार्ग बाधित ग्रामस्थांना कार्यालयीन कामांसाठी अतिरिक्त प्रवास करावा लागून गैरसोय वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः जमीन संपादन, भरपाई, सेवा रस्ते, अंडरपास, उड्डाणपूल आणि स्थानिक पातळीवरील मागण्यांबाबत नागरिकांना वारंवार पीआययू कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे कार्यालय जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या हिताचा विचार करून एनएचएआयला पीआययू कार्यालय शिर्डी येथे हलवू नये, असे निर्देश द्यावेत, अशी मागणी खा. नीलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles